नाशिक : अतिशय अवघड व खडतर अशा फ्रान्सच्या विचीमध्ये झालेली आयर्नमॅन - २०१८ ही स्पर्धा नाशिक शहराचे पोलीस आयुक्त डॉ़ रविंद्रकुमार सिंगल यांनी रविवारी (दि़२६) जिंकली़ या स्पर्धेत महाराष्ट्रातून भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) एकमेव अधिकारी म्हणून डॉ़ रविंद्रकुमार सिंगल सहभागी झाले होते़ या स्पर्धेसाठी जगभरातून एक हजार तीनशे स्पर्धक आर्यर्नमॅन - २०१८ हा किताब पटकावण्यासाठी सहभागी झाले होते़ विशेष म्हणजे डॉ़ सिंगल यांनी स्पर्धेचा निर्धारीत वेळ १६ तासांऐवजी १५ तास १३ मिनिटांमध्येच ही स्पर्धा पुर्ण करून देशाची मान उंचावली़ स्पर्धा पूर्ण करताच त्यांनी अभिमानाने देशाचा तिरंगा फडकाविला़
फ्रान्समध्ये गत अनेक वर्षांपासून आयर्नमॅन स्पर्धेचे आयोजन केले जात असून यामध्ये जगभरातील स्पर्धक सहभाग घेतात़ अत्यंत खडतर व अवघड असलेली ही स्पर्धा १६ तासांमध्ये पूर्ण करावयाची असते़ या स्पर्धेत प्रथम चार किलोमीटर पोहणे (स्विमिंग), १८० किलोमीटर सायकलींग व त्यानंतर ४२ किलोमीटर धावणे (रनिंग) या तिन्ही स्पर्धा या १६ तासांमध्ये पूर्ण कराव्या लागतात़ मात्र, डॉ़ सिंगल यांनी १५ तास १३ मिनिटातच ही स्पर्धा पूर्ण करून आयर्नमॅनचा किताब पटकावला आहे़ इंग्लंडच्या प्रमाणवेळेनुसार रविवारी (दि़२६) पहाटे पाच वाजता फ्रान्स सुरु झालेली ही स्पर्धा रात्री दहा वाजता संपली़
डॉ़ सिंगल यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी अतिशय खडतर असलेला आयर्नमॅन हा किताब पटकावला असून महाराष्ट्र व नाशिकसाठी ही भूषणावह बाब आहे़ या स्पर्धेसाठी देशभरातून स्पर्धेक सहभागी झाले असले तरी आयपीएस अधिकारी असलेले सिंगल हे एकमेव अधिकारी असून ते महाराष्ट्रातून सहभागी झाले होते़ या स्पर्धेसाठी गुरुवारी (दि़२३) सायंकाळी फ्रान्सला रवाना झाले होते़ या खडतर स्पर्धेत सहभाग तसेच निर्धारीत वेळेपुर्वीच पुर्ण करून त्यांनी देशाची मान उंचावली आहे़ त्यांच्या या यशस्वीतेबाबत विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जाते आहे़
नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा आयर्नमॅन स्पर्धेत ४ किलोमीटर स्विमिंग, १८० किलोमीटर सायकलींग व ४२ किलोमीटर रनिंग हे १६ तासात पूर्ण करावयाचे असते़ मात्र डॉ़रविंद्र सिंगल यांनी ही स्पर्धा १५ तास १३ मिनिटांमध्येच पूर्ण केली़ याुपर्वी २०१५ मध्ये सुप्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण तर २०१७ मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक २०१७ कृष्णप्रकाश यांनी ही स्पर्धा पुर्ण केली होती़ २०१८ ची आयर्नमॅन स्पर्धा पोलीस आयुक्त डॉ़सिंगल यांनी जिंकल्याने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे़ डॉ़सिंगल यांना नाशिकच्या स्पोर्ट्स मेड सेंटरमध्ये डॉ़पिंप्रिकर व डॉ़ मुस्तफा टोपीवाला यांनी प्रशिक्षण दिले़