मानोरी : कुटुंबाने वाऱ्यावर सोडून दिलेल्या वयोवृद्धाला वाली नाही. ‘त्या’ वयोवृद्धाला येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील सैंगऋषी आश्रमातील नवनाथ जऱ्हाड हे नि:स्वार्थपणे आधार देत असताना पुन्हा एका ८० वर्षीय निवृत्तीला नवनाथने आधार देत सामाजिक एकोपा जपला आहे.
त्याचे घडले असे की , तोसीफ शेख हे नेहमीप्रमाणे धुळगाव येथे एका पोल्ट्री शेडवर कामावर जात असताना वयोवृद्ध निराधार व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसलेली त्यांना दिसली. या वयोवृद्धाची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव केवळ निवृत्ती सांगितले. तसेच कुटुंबात कोणतीही व्यक्ती राहिली नसल्याचा धसका घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी ही गोष्ट भीमराज साळुंखे यांना सांगितली. साळुंखे यांनी तत्काळ सैंगऋषी आश्रमाचे व्यवस्थापक नवनाथ जऱ्हाड यांच्याशी संपर्क साधून निराधार वयोवृद्धाबद्दल माहिती दिली. जऱ्हाड यांनी धुळगाव येथे जाऊन वयोवृद्ध निवृत्ती यांची भेट घेऊन विचारपूस केली असता या वृद्धाने कौटुंबिक आपबिती कथन केली. कुटुंबात कोणीही राहिलेले नसल्याचा धसका निवृत्तीने घेतला असल्याचे लक्षात येताच जऱ्हाड यांनी वयोवृद्धाला आपल्या आश्रमात नेण्याचे ठरवले. आश्रमात नेऊन सेवा करेन असे शब्द नवनाथ यांनी उच्चारले असता निवृत्ती यांना अश्रू अनावर झाले. शिरसगाव येथील आश्रमात निवृत्ती यांना आणण्यात आले आहे.
यावेळी राजेंद्र सोनवणे , भगवान गायकवाड , तोसीफ शेख , ज्ञानेश्वर पवार, संतोष राजगुरु, गोरख गायकवाड, सचिन गायकवाड आदींनी जऱ्हाड यांचे आभार मानले.
फोटो ०५ मानोरी : वयोवृद्ध निराधार निवृत्ती यांना सैंगऋषी आश्रमात नेताना नवनाथ जऱ्हाड. समवेत ग्रामस्थ.