नाशिक : गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सावात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहे. पितृपक्षाच्या समाप्तीनंतर बुधपासून (दि.१०) प्रारंभ झाला असून नवरोत्रोत्सवाच्या पहिल्या दिवसांपासूनच झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून दसऱ्याच्या पाश्वभूमीवर यात आणखी वाढ झाल्याने झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १५० ते १६० रुपये जाळीने विकला जात आहे. नवरात्रोत्सवात नैसर्गिक सजावटीसाठी फुले हा अतिशय उत्तम पर्याय असल्याने वेगवेगळ्या फुलांचा आरास सजावटीसाठी अधिकाधिक वापर केला जातो. यंदाही हे चित्र कायम असून, फुलबाजार गर्दीने गजबजून गेला आहे. दसऱ्याच्या दिवशी तर घरातील देवदेवतांसह, शस्त्रपूजन व वाहने व गृहसजावटीसाठीही फुलांचा वापर होत असल्याने फुलांना मागणी वाढली आहे. यात सर्वाधिक मागणी झेंडूच्या फुलांना असून अन्य सुगंधी फुलांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात कापडाची कुत्रिम फुले उपलब्ध असली तरी भारतीय संस्कृतीतील विविध सण उत्सवांमध्ये खºया फुलांची सजावट विशेष आकर्षक ठरते. हार-तुरे, गजरे, तोरणे अशा अनेक रूपांत ही फुले उत्सवात आणखी सुंदरता भरतात. बाजारात बाराही महिने फुले उपलब्ध असली, तरी सणांच्या काळात त्यांची मागणी कितीतरी अधिक पटीने वाढते. पर्यावरणपूरक संकल्पनांवर आधारित गणेशोत्सव आणि सुगंधी फुलांचे आकर्षण यामुळे फुलबाजारात नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात फुलांच्या खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. नवरात्रोत्सवात विविधरंगी फुलांच्या सुगंधामुळे बाजारातही उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पहायला मिळत आहे. नाशिक शहर परिसरातील मखमलाबाद, आजगाव, दरी मातोरी, जानोरी, मोहाडी परिसरांतून प्रामुख्याने फुलांची आवक होत असून दिंडोरी आणि सिन्नर परिसरातील फुलशेतीला यावर्षी दुष्काळाच्या झळा बसल्याने फुलांचे भाव वधारल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
फुलांचे प्रकार /प्रमाण | ( प्रती किलो/जाळी/शेकडा चे दर ) |
---|---|
झेंडू *जाळी- *शेकडा- | १५०ते १६० रुपये, ५०ते ६० रुपये, |
मोगरा (प्रतिकिलो) | ६०० ते ८०० रुपये |
शेवंती (प्रतिकिलो) | ६० ते ८० रुपये |
जरबेरा (प्रति १० नग) | ५० ते ६० रुपये |
निशिगंधा (प्रतिकिलो) | १०० ते १२०रुपये |
*गुलाब (प्रति १० नग)*साधा गुलाब (प्रति १० नग) | ८० ते ९० रुपये १५ ते २५ रुपये |
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण घटल्याने यावर्षी झेंडू ३० ते ४० रुपयांनी महागला आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यानी सुरुवातीला मोठ्या आकाराचा झेंडू बाजारात विकला असून नवरात्रीच्या शेवटच्या दोन दिवसात सर्व झेंडू बाजारात आणण्याची शक्यता असल्याने पुरेशा प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. संदीप शिंदे, अध्यक्ष, फु लविक्रेता संघटना, फुलबाजार नाशिक.