नाशिकरोड : नाशिकरोड परिसरातील विविध देवी मंदिरांमध्ये तसेच घरोघरी मोठ्या भक्तिभावाने देवीमूर्तीची तसेच घट स्थापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळानी ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत देवी मूर्तीची मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना केली. परिसरातील मंदिरांमध्ये पहिल्याच दिवशी गर्दी झाली होती.नाशिकरोड श्री दुर्गा देवी मंदिर, सुभाषरोड, जगताप मळा श्री सप्तशृंगी मातामंदिर, देवळालीगाव श्री रेणुका माता मंदिर, देवी चौक, वास्को चौक, टिळकपथ येथील देवी मंदिर, जयभवानीरोड औटे मळा जय भगवती माता मंदिर, श्री महालक्ष्मी माता मंदिर, जेलरोड श्री दुर्गा देवी मंदिर, जेलरोड इंगळेनगर व सेंट फिलोमिनाशेजारील रस्त्यावर श्री महालक्ष्मी मंदिर आदी देवी मंदिरांमध्ये रविवारी विधिवत पद्धतीने पूजा करून घट स्थापना करण्यात आली. देवी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मंडप उभारण्यात आला आहे. देवीच्या धार्मिक गीतामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याने परिसर भाविकांनी फुलून गेला होता. श्री दुर्गा देवी मंदिरात दिवसभर दर्शनासाठी व रात्री ८ वाजता आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.देवीची फुलांनी सजावटपरिसरात घरोघरी घटाची स्थापना करण्यात आली. यामुळे दिवसभर गृहिणी वर्गाची धावपळ दिसत होती. देवळालीगाव, शिवाजी पुतळा, जेलरोड इंगळेनगर, शिवाजी पुतळा आदी ठिकाणी महिला भाविकांची पूजेचे व घटाचे साहित्य घेण्यासाठी गर्दी झाली होती. नाशिकरोड परिसरात ७५ हून अधिक मंडळाकडून सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. सार्वजनिक मंडळांनी वाजत गाजत देवी मूर्तीची मिरवणूक काढून विधीवत मूर्तींची स्थापना केली. सायंकाळपर्यंत सर्वच ठिकाणी घटाची स्थापना करण्याची लगबग सुरू होती.
उपनगरांमध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:32 AM