नाशिक : व्यापारातील आर्थिक रक्कम वसूल करण्यासाठी मालकासोबत आलेल्या नोकरानेच दहा लाखांचा अपहार करून पलायन केल्याची घटना शनिवारी रात्री रविवार कारंजा परिसरात घडली़ पोलिसात या घटनेबाबत फिर्याद दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासातच या नोकराला अहमदनगर बसस्थानकात अटक करण्यात सरकारवाडा पोलिसांना यश आले़ दरम्यान, रविवारी त्यास जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ पुणे येथील मसाला व्यापारी विशाल केवलराज दोषी हे आपल्या विश्वासू नोकर बसवराज गायकवाडसोबत रविवार कारंजावरील परेश ट्रेडिंग कंपनीत आले होते़ व्यवहारातील दहा लाख रुपये असलेली बॅग घेतल्यानंतर त्यांनी ती बॅग विश्वासू नोकर गायकवाडच्या हातात दिली व व्यवहाराची बोलणी करीत होते़ यादरम्यान संशयित गायकवाडने पैशांची बॅग घेऊन पळ काढला़ ही गोष्ट दोषी यांच्या लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून संशयित बसवराज गायकवाड यास अहमदनगर बसस्थानकावर रकमेसह अटक केली़ ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली़ दरम्यान, संशयित गायकवाड यास न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी) --इन्फो-- मोबाइल लोकेशनचा फायदा संशयित बसवराव गायकवाड याने दहा लाखांच्या रकमेची बॅग घेऊन पलायन केल्यानंतर दोषी यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला़ त्यामध्ये त्याचा मोबाइल नंबर दिलेला असल्याने पोलिसांनी तो ट्रॅकवर लावला व त्याद्वारे गायकवाडचे लोकेशन घेतले व संबंधित पथकाला वेळोवेळी या लोकेशनची माहिती दिली़ त्यानुसार तपासी पथकाने बसवराजला अहमदनगर बसस्थानकावर पकडण्यात आले़
नोकराचा मालकाला दहा लाखांचा गंडा अवघ्या काही तासांतच नोकरास अटक : सरकारवाडा पोलिसांची कारवाई
By admin | Published: February 01, 2015 11:58 PM