नाशिक : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मनपाच्या वतीने मोबिलिटी सेलने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी (दि.१७) घेतला असून, त्यानुुसार शहरात २८ ठिकाणी वाहनतळ (आॅनस्ट्रिट पार्किंग) मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरात संपूर्णपणे अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या सेलची बैठक सोमवारी (दि.१७) महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, एसटी, महामार्ग विभाग तसेच वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.शहरात येणाºया अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे शहरात ठराविक वेळेतच या वाहनांना प्रवेश देण्याचा प्रस्ताव असून, ही वाहने शहराबाहेर ट्रक टर्मिनस आणि अन्य ठिकाणी उभी करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी अभ्यास करून अधिसूचना काढण्याचे यावेळी ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत आॅनस्ट्रिट २८ ठिकाणी आणि पाच ठिकाणी आॅफस्ट्रिट पार्किंगचा प्रस्ताव आहे. त्यात २८ ठिकाणी आॅनस्ट्रिट पार्किंगचा प्रस्ताव असून, महापालिकेच्या प्रस्तावाला ना हरकत दाखला पोलीस यंत्रणा प्रत्यक्ष जागेची तपासणी करून देणार आहे. या ठिकाणी वाहने सरळ रेषेत लावावी की, तिरक्या रेषेत याबाबत तांत्रिक मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला होता. मात्र तांत्रिकता तपासून पोलिसांनीच निर्णय घ्यावा, असे महापालिका आयुक्त गमे यांनी स्पष्ट केले.महापालिकेच्या वतीने प्रोजेक्ट गोदा प्रकल्पाला लवकरच सुरुवात होत असून, रामवाडी पुलापासून टाळकुटे पुलापर्यंतच्या टप्प्यात विकास केला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आत्ताच जागा बघून कोणत्या जागेत ना फेरीवाला क्षेत्र तसेच वाहनतळ हवे याचा अभ्यास करून नियोजन करावे, असेही आयुक्त गमे यांनी सुचविले, तर त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ दरम्यानच्या स्मार्टरोडचे काम वेळेत पूर्ण करण्यावरदेखील भर देण्यात आला. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) शिवाजी चव्हाणके, अपआयुक्त रोहिदास बहिरम, शिवाजी आमले, कार्यकारी अभियंता (नगररचना) उदय धर्माधिकारी, (वाहतूक शाखा) रामसिंग गांगुर्डे, रवींद्र बागुल, उपप्रादेशिक अधिकारी विनयअहिरे, शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक फुलसिंग भोये, न्हाईचे उपप्रकल्प संचालक दिलीप पाटील, नाशिक फर्स्टचे देवेंद्र बापट, अभय कुलकर्णी आणि प्रमोद लाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.कॉलेजरोडसह तीन ठिकाणी सिग्नलकॉलेजरोडवरील प्रि.टी.ए. कुलकर्णी चौक, सातपूर येथील पपया नर्सरी चौक तसेच नाशिकरोड येथील विहितगाव चौकात सिग्नल सुरू करण्याचा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. कॉलेजरोडवरील वाहतूक समस्येबाबत गेल्याच आठवड्यात लोकमतने लक्ष वेधले होते आणि कुलकर्णी चौकात सिग्नलचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर लगेचच कुलकर्णी चौकात सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय जुन्या पोलीस आयुक्तालय म्हणजेच एचडीएफसी बॅँकेच्या चौकाजवळ सिग्नलसाठी पुरेशी जागा नसल्याने त्याठिकाणी अन्य पर्याय शोधण्याचे ठरविण्यात आले, तर गोविंदनगर येथील कर्मयोगी चौकात सिग्नल बसविण्याऐवजी आधी वाहतूक बेट विकसित करण्याचे ठरविण्यात आले.सिटी सेंटर मार्गावरही आता पार्किंगसिटी सेंटर मॉल परिसर सध्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचा होत असून, मध्यंतरी महापालिकेच्या वतीने मॉलपासून ठक्कर डोमपर्यंत रस्त्याच्या कडेलगत परस्पर वाहनतळ सुरू केला. पोलिसांनी याठिकाणी वाहनतळासाठी परवानगी दिली नसतानाही तत्कालीन आयुक्तांनी यासंदर्भात महापालिकेलाच अधिकार असल्याचे सांगून प्रायोगिक वाहनतळ सुरू केले होते. पोलिसांनी आक्षेप घेतल्यानंतर ते बंद करण्यात आले असे असले तरी आता मात्र २८ आॅनस्ट्रिट पार्किंगमध्ये मॉलच्या बाहेरील पार्किंगचादेखील प्रस्ताव असून हा विषयदेखील आता मार्गी लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरातील १४५ चौक आणि दुभाजकांच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेने प्रायोजकांमार्फत प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार २५ प्रायोजकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यातील १८ जणांचे प्रस्ताव सोमवारच्या मोबिलिटी सेलच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.
अपघातांच्या ब्लॅक स्पॉटवर होणार कारवाईकेंद्र सरकारने शहरांमधील अपघात प्रवण क्षेत्र म्हणजेच ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने समिती नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू केली असून, शहरातील १२ ब्लॅक स्पॉट नष्ट करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले आहे. ज्या ठिकाणावर आत्तापर्यंत दहा अपघात घडले आहे किंवा पाच जण अपघातात मृत्युमुखी पडले असतील तर अशा ठिकाणांना अपघात प्रवण क्षेत्र म्हटले जाते.