नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र संचालनालय मुंबई ‘ब’ सेव्हन महाराष्ट्र बटालियनच्या दि.२३ डिसेंबरपासून सुरू असलेल्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या अखिल राष्ट्रीय शिबिराचा गुरुवारी (दि.३) समारोप झाला.सैनिकी शिस्तीबरोबरच सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) शिबिरात महाराष्ट्रासह केरळ व लक्षद्वीप एनसीसी संचालनालयाचे एकूण ६०० विद्यार्थ्यांसह ४० प्रशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. याप्रसंगी कॅम्प डेप्युटी कमांडंट कर्नल यू.एस. कुशवाहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एनसीसी छात्रांनी देशाची सेवा करावी तसेच कोणत्याही परिस्थितीत सामाजिक जाणिवेचे भान ठेवून व्यक्तिमत्त्व विकास वाढीसाठी प्रयत्न कराव असे आवाहन करतानाच समाजाच पसरणाऱ्या अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.त्याचप्रमाणे अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही नैपुण्य मिळविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. एनसीसी शिबिरादरम्यान कर्नल सतीश शिंदे, कॅप्टन शैला मेंगाणे व लेफ्टनंट आर.आर. शिंदे यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणासोबतच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिबिरकाळात विविध सांस्कृतिक व क्रीडा, वादविवाद, पथनाट्य आदी विविध स्पर्धांही घेण्यात आल्या होत्या. या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना समारोप सोहळ्यात पारितोषिके व पदक देऊन गौरविण्यात आले.
एनसीसीच्या शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 12:44 AM