नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या लिखाणावरून छगन भुजबळ यांनी राऊत यांना चांगलेच आडव्या हाताने घेतले. राष्ट्रवादीवर बारकाईने लक्ष ठेवण्यापेक्षा राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बॅगांवर लक्ष ठेवले असते तर आज सत्तेच्या बाहेर बसावे लागले नसते असा टोला लगावला आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या भुजबळ यांनी सोमवारी(दि. ८) माध्यमांशी संवाद साधला असता, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, शरद पवार यांच्या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रालयातील उपस्थितीबाबत उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी संयमाने उत्तर दिले असून, त्यावर भाष्य करण्याची संजय राऊत यांना काहीच गरज नाही. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे राऊत यांना वाटते काय असा सवाल करून भुजबळ यांनी त्याचा संदर्भ घेऊन जर राऊत यांनी शरद पवार यांच्याविषयी लेखन केले असेल तर ते चुकीचे असून, राऊत यांचे जितके वय आहे त्यापेक्षा अधिक काळ पवार यांनी राजकारणात घातलेले आहेत. त्यामुळे त्यांना सल्ला देण्याच्या भानगडीत कोणी पडू नये.