लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट सत्तारूढ सेना-भाजपबरोबर आहे, मात्र सध्या राष्ट्रवादीत फूट आहे की हे संमतीचे राजकारण सुरू आहे याबाबत संभ्रम आहे. त्यावर भाष्य करताना भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हा संभ्रम लवकरच दूर होईल असे म्हटले आहे.
गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला, त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही, अजितदादा पवार आणि छगन भुजबळ तसेच दिलीप वळसे पाटील हे भाजपबरोबर येतील असे वाटले होते का, असा प्रश्न जयंत पाटील यांच्या भाजपच्या पक्षप्रवेशाबाबत बोलताना त्यांनी केला. सध्या सत्तारूढ पक्षांमध्ये खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू असली तरी कोणाला कोणते खाते द्यायचे हे नेते ठरवतील आणि सर्व संमतीने यावर निर्णय होईल. यावरून सध्या सरकारमध्ये कोणतेही ताणतणाव नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
ध्वजारोहणासाठी मंत्र्यांना वेगवेगळे जिल्हे देण्यात आले आहेत, त्यामुळे पालकमंत्री पदबदलाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र महाजन यांनी पालकमंत्री पदाबाबत काहीच वाद नाही. छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री व्हावे असे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत असेल तर गैर नाही असे ते म्हणाले.