मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. शिंदे गटासह भाजपचे नेते, मंत्रीही अयोध्या दौऱ्यावर गेलेत. यावरून आता महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात मंत्री एकही शिल्लक नाही, सगळे अयोध्येला गेले. जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. देव देव करा, पण अवकाळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्या, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. सरकारच शेतकऱ्यांकडे लक्षच नाही. त्यामुळे सत्तेवर योग्य माणूस आपण बसवला नाही तर अशा पद्धतीने सरकार जनतेला वेठीस धरले जाते, असं छगन भुजबळ यांनी सांगितले. देवरगाव येथे आदिवासी आश्रम शाळा इमारत व मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी छगन भुजबळ बोलत होते.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील निशाणा साधला आहे. अयोध्या दौरा सत्ताधाऱ्यांना महत्त्वाचा वाटतो. त्यासाठी मंत्रिमंडळातील खासदार, आमदार अयोध्येत जाऊन बसलेत. याचा अर्थ मूळ प्रश्नांना बगल देणे आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. हा श्रद्धेचा प्रश्न असल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांची श्रद्धा अयोध्येत आहे. आमची श्रद्धा शेतकऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीशी निगडीत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसत, संकटातून त्याला मदत कसे करता येईल, यावर आमची श्रद्धा आहे. प्रत्येकाचे धोरण वेगळे असू शकते, असा टोला शरद पवारांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"