नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर या घटनेचे प्रत्येकाने आपापल्यापरीने अंदाज बांधले. राजकीय पातळीवर आणि माध्यमांनी देखील यातून अनेक अर्थ काढले त्यानुसार संजय राऊत यांनी अर्थ काढला असेल अशी टीका विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली.
शरद पवार हे उत्तराधिकारी निर्माण करण्यास अपयशी ठरले, अशी टीका ‘सामना’मधील अग्रलेखातून करण्यात आल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिकमध्ये झिरवाळ यांना याबाबत विचारले असता त्यांनी पवार यांचे राजकीय नेतृत्व सर्वमान्य असून इतर पक्षातही त्यांचा आदर राखला जातो. पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यातून अनेकांनी वेगवेगळे राजकीय अर्थ काढले. आपण जसे पाहू तसे आपणाला दिसते. त्यानुसार त्यांच्या राजीनाम्याला विविध चष्म्यातून पाहिले गेले. राऊत यांनी देखील त्यांच्या पद्धतीने अर्थ लावून शंका उपस्थित केली असेल, अशी प्रतिक्रिया झिरवाळ यांनी व्यक्त केली.