नाशिक : महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसने महापौरपद लढविण्यासाठी मनसेचेच समर्थन घेण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत रणनीती ठरल्यानंतरच वेगाने हालचाली झाल्या आणि मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली.शुक्रवारी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीसंदर्भात भुजबळ फार्म येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. भाजपाने मनसेला एकाकी सोडल्याने निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकत्र आले आणि अपक्ष बरोबर राहिले तरी बहुमत होणार नाही. त्यातच कॉँग्रेसचे काही नगरसेवक फुटल्याचा संशय असून, त्या पार्श्वभूमीवर मनसेला बरोबर घेतले पाहिजे, अशी चर्चा करण्यात आली. शिवसेनेच्या उमेदवाराने सर्वच पक्षांतील नगरसेवकांना आमिष दाखवून फोडाफोड सुरू केली, तसेच जातीयवादी शक्तींच्या हाती पालिकेची सत्ता देऊ नये यासाठी एकत्र राहण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीनंतरच तातडीने सूत्रे हालली. बैठक संपल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना गुंगारा देऊन माजी खासदार समीर भुजबळ तसेच अन्य पदाधिकारी तेथून निघाले आणि तडक कॉँग्रेस गटनेता उत्तमराव कांबळे यांच्या निवासस्थानी गेले. तेथे मनसेचे आमदार वसंत गिते आणि अतुल चांडकदेखील उपस्थित होते. त्यानंतर मनसे, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचा फार्म्युला चर्चिला गेला. (प्रतिनिधी)
महापौरपद मात्र हवे राष्ट्रवादीलाच
By admin | Published: September 12, 2014 12:35 AM