पंचवटी : पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात कचरा जाळल्याप्रकरणी नियमांची पायमल्ली केली या कारणावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरटीओ कार्यालयाला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच आरटीओ कार्यालयाने महापालिकेच्या तीन वाहनांना काळ्या काचा बसविल्याप्रकरणी नोटीस बजावली. विशेष म्हणजे, आरटीओची काळ्या काचा बसविणाºया वाहनांविरुद्ध कोणतीही मोहीम नसताना बुधवारी मनपा मालकीच्या तीन चारचाकी वाहनांना अडवून काचांवर लावलेल्या काळ्या फिल्म काढून सदर वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयात तपासणीसाठी आणण्याचा मेमो बजावण्यात आला. मनपाचे एक वाहन गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्सजवळ, तर अन्य दोन वाहने पंचवटीतील मनपाच्या वाहन भांडाराच्या प्रवेशद्वारावर अडवून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका अधिकाºयाने मेमो दिला. मंगळवारी सकाळी ११ वा. आरटीओ कार्यालयात कचरा जाळल्यानंतर धुराचे लोळ पसरले होते. त्यावेळी काही नागरिकांनी पंचवटी अग्निशमन दलाला आरटीओ कार्यालयात आग लागल्याची माहिती कळविली होती. त्यानंतर जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कचरा विझविला होता. या घटनेनंतर मनपाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात कचरा जाळून प्रदूषण केले म्हणून आरोग्य विभागाचे संजय गोसावी यांनी आरटीओला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. या नोटीसला प्रत्युत्तर म्हणून की काय आरटीओच्या एका अधिकाºयाने बुधवारी मनपाच्या वाहनांना काळ्या काचा आहेत म्हणून मेमो दिल्याने मनपाचा वचक काढण्यासाठीच ही कारवाई केल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू होती.
मनपा, आरटीओची एकमेकांवर कुरघोडी ; महापालिकेच्या वाहनांना काळ्या काचा बसविल्याप्रकरणी नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:46 AM