नाशिक : कोरोना विषाणूने नाशिक शहरात थैमान घातले असून नाशिक महापालिका व सत्ताधाऱ्यांचा निष्काळजीपणा व भोंगळ कारभार जनतेसमोर येत आहे. शहरातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या समोर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.नाशिक मध्ये कोरोनाने अक्षरशः उच्छाद मांडला असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व कोविड सेंटर सुरू करणे अपेक्षित होते. परंतु महापालिका व सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे ते सुरू होऊ शकले नाहीत. तसेच कमी करण्यात आलेला कंत्राटी कर्मचारी वर्ग सद्यस्थितीत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर कोरोना बाधित रुग्णांची देखभालीची जबाबदारी आल्याने तेही कोरोना बाधित होऊ लागले आहेत. रुग्ण दाखल करण्यासाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेड शिल्लक नाही. कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड वाढविण्यात यावे, रेमडिसिव्हरसह इतर औषधाचा पुरवठा करण्यात यावा, सफाई कर्मचारी व इतर नर्स कर्मचारी वाढविण्यात यावे, तसेच स्ट्रेचरसह इतर साधनसामग्री देण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली. तसेच मनपा आरोग्य यंत्रणेलाच कोविड झाल्याचा खोचक टोला शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी लगावला. याप्रसंगी शहर सरचिटणीस संजय खैरनार, नाशिकरोड अध्यक्ष मनोहर कोरडे, प्रशांत वाघ, जय कोतवाल, विक्रम कोठुले, विशाल डांगळे, चैतन्य निकाळे, सौरभ पवार, विशाल घाडगे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्फो
बिटको कोविड रूग्णालयात सफाई कर्मचारी नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून रुग्णांजवळ घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचा आरोपदेखील करण्यात आला. रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे रेमडिसिव्हर व इतर औषधे रुग्णालयात नसल्याच्या वारंवार तक्रारी होत असूनही पुरवठा नाही. काही ठिकाणी कोरोना बधितांना औषध व इंजेक्शन देण्यासाठी कर्मचारी वर्गच नसल्याने तीही जबाबदारी रुग्णांचे नातेवाईक पार पाडत असल्याचा आरोपदेखील करण्यात आला.