सटाणा : बागलाण विधानसभा मतदारसंघात अखेरच्या क्षणी भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांनी बाजी मारली आहे. चव्हाण यांनी ४१८१ मताधिक्क्य घेऊन विजयी झाल्या आहे. त्यांना ६८४३४ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे यांना ६४२५३ मते मिळाली. दीपिका चव्हाण यांनी बागलाणमधून प्रथम महिला आमदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळविला. काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि बसपासह नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. शहरातील भक्षी रोडवरील गुरुप्रसाद मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागडे, सहायक निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार पोतदार यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून भाजपाचे उमेदवार दिलीप बोरसे यांनी मतांची आघाडी घेतली . सहाव्या फेरीपर्यंत बोरसे ९३४ मते मिळवत आघाडीवर होते. मात्र आठव्या फेरीत राष्ट्रवादीच्या चव्हाण यांनी मुसंडी मारत १६४ मतांची आघाडी घेतली. ती पुढील सर्वच फेऱ्यांमध्ये वाढत जाऊन अखेरच्या फेरीत चव्हाण यांनी ४१८१ मते घेत विजय संपादन केला. अन्य नऊ उमेदवारांची अनामत जप्त होऊन त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली. त्यांना मिळालेली मते अशी जयश्री बर्डे (काँग्रेस) ६९४०, साधना गवळी (शिवसेना) ९०७२, बापू माळी (मनसे ) २३१९, अलका माळी (बसपा) ११५२ , शिवाजी अहिरे (अपक्ष) ४६०, प्रमिला मोरे (अपक्ष) ६०४, वंदना माळी (अपक्ष) ४०२, महेश शिंदे (अपक्ष) ९३२, अभिमान सोनवणे (अपक्ष ) ८१०. दरम्यान, चव्हाण विजयी झाल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला. यावेळी शहरातील प्रमुख मार्गाने ढोलताशाच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.संजय चव्हाण यांचे ऐन निवडणुकीत जात प्रमाणपत्र रद्द झाले याची सहानुभूती मिळवत पत्नी दीपिका साठी मते पदरात पाडून घेण्यात यश मिळविले.त्यातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एक संघ प्रचारा बरोबर सटाणा शहरात मिळालेली ३७८१ मतांची आघाडी चव्हाणांना विजयश्री खेचून आणण्यात कामी आली .