विंचूर : जिल्हा परिषदेच्या विंचूर गटात थोरे-दरेकर यांच्यात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत किरण पंढरीनाथ थोरे यांनी आघाडी घेत विंचूर गटात राष्ट्रवादीचा झेंडा रोवला आहे. थोरे यांनी ३३५१ मतांची आघाडी घेत विजयश्री आपल्याकडे खेचून आणली. या निवडणुकीमुळे गटात भाकरी फिरल्याने शिवसेनेकडील विंचूर गट आता घड्याळ्याच्या ताब्यात आला आहे.मंगळवारी झालेल्या मतदानानंतर सर्वच उमेदवारांनी थोड्याफार मताचा अंदाज देत विजयाचे गणित मांडले होते. राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या पत्नी जि.प.च्या विद्यमान शिक्षण सभापती किरण थोरे, भाजपाकडून अश्विनी दरेकर तर शिवसेनेकडून शोभा दरकेर या उमेदवारांसाठी मतदान होऊन मतदारांनी विजयाचा कौल राष्ट्रवादीच्या थोरे यांना दिला आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या विंचूर गट व गणावर शिवसेनेने भगवा फडकविला होता. यंदा मात्र त्याचा वचपा काढत राष्ट्रवादीने विंचूर गटात घड्याळाची बंद झालेली टिकटिक पुन्हा सुरू केली आहे. शोभा दरेकर व अश्विनी दरेकर यांच्यातील मतविभागणीमुळे राष्ट्रवादीला फायदा झाल्याचे चित्र आहे.विंचूर गणात भाजपाचे संजय शेवाळे यांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे भय्यासाहेब देशमुख, राष्ट्रवादीकडून सचिन दरेकर तर मनसेकडून नरसिंह दरेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपाचे संजय शेवाळे आणि राष्ट्रवादीचे सचिन दरेकर यांच्यात लढत होऊन शेवाळे यांनी ७७० मताधिक्य घेत विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. विंचूर गटातील डोंगरगाव गणातून शिवसेनेच्या अनुसया अण्णा जगताप विजयी झाल्या. यंदा विंचूर गटात झालेल्या मतदानात २९२ मतदारांनी ‘नोटा’ पर्याय वापरला आहे. (वार्ताहर)
विंचूर गटात राष्ट्रवादीच्या किरण थोरे
By admin | Published: February 24, 2017 12:21 AM