नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक काबीज करण्यासाठी व त्याची रूपरेषा आखून पक्ष संघटना बांधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सर्व फ्रंट व आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने आगामी काळातील राजकीय वाटचाल व सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावर विचारविमर्श करण्यात आला. शहराध्यक्ष रंजन ठाकरे व दिलीप खैरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विदर्भातली भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने ४० हजार मताधिक्याने जिंकल्याने पक्षाची जागा वाढून आत्मविश्वास वाढला आहे. यानिमित्ताने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा दुप्पट कशा वाढतील तसेच आघाडी व मित्रपक्षाला सत्तेवर आणण्यासाठी पक्ष संघटना बांधणी महत्त्वाची असल्याने त्याची रूपरेषा व दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे सर्व फ्रंट व सेलच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. गुरुवारी सकाळी १० वा. भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत युवा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चास उपस्थित राहण्याचे आवाहन झालेल्या बैठकीत करण्यात आले. याप्रसंगी मुख्तार शेख, अंबादास खैरे, संजय खैरनार, अनिता भामरे, सुषमा पगारे, समीना मेमन, गौरव गोवर्धने, सलीम शेख, धनंजय निकाळे, सुरेश आव्हाड, डॉ. अमोल वाजे, राकेश मुंडावरे, संजय बोडके आदी उपस्थित होते. युती सरकारने पेट्रोल-डिझेल व महागाई वाढवून जनतेचे कंबरडे मोडले आहे. या सरकारवर सर्वच घटक नाराज असून, सरकारने शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत म्हणून जगाचा पोशिंदा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. लोकशाहीवर विश्वास असलेले सगळे आता भाजपाच्या विरोधात एकत्र येत असून, त्यासाठी पक्ष बांधणी आवश्यक असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी झालेल्या बैठकीत सांगितले.
पक्ष संघटना बांधणीसाठी राष्ट्रवादीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:27 AM