ठळक मुद्दे हुकूमशहासारखे वागून लोकशाही पायदळी तुडवू नये,महापालिकेत मुंढे यांनी दादागिरी थांबवावीभुजबळ यांनी शिष्टमंडळासह मुंढे यांची भेट घेणे पसंत केले नाही
नाशिक : ‘मुंढे यांनी आयुक्त म्हणून शहराच्या विकासाचा कारभार करावा, हुकूमशहासारखे वागून लोकशाही पायदळी तुडवू नये, महापालिकेत त्यांनी आपली दादागिरी थांबवावी. कामकाजात सुधारणा झाली नाही तर आंदोलनाची वज्रमूठ अधिक घट्ट केल्याशिवाय राहणार नाही’ असा रोखठोक इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या मोर्चाद्वारे दिला.
महापालिकेकडून करण्यात आलेली करवाढ, बंद केलेल्या अंगणवाड्या, सिडकोवर केलेली वक्रदृष्टी अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.१०) दुपारी अडीच वाजता मुंबईनाका येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी भवनावरमोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्याच्या कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, भुजबळ यांनी शिष्टमंडळासह मुंढे यांची भेट घेणे पसंत केले नाही. माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह शिष्टमंडळाने तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन निवेदन दिले व विविध मागण्यांवर चर्चा केली; मात्र मुंढे यांनी त्यांच्या सर्व मागण्यांबाबतचा खुलासा करत कुठल्याहीप्रकारे बेकायदेशीर काम महापालिका प्रशासनाकडून केले जात नसल्याचे स्पष्ट केले. तसेच अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकची करवाढ अत्यंत कमी असल्याचेही सांगितले.यावेळी राजीव गांधी भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भुजबळ यांनी उपस्थित शेकडो मोर्चेकऱ्यांना उद्देशून बोलताना सर्वप्रथम मुंढे यांच्या कारभाराचा समाचार घेतला. त्यानंतर भाजपा आणि फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, अंगणवाड्यांचा प्रश्न संपुर्ण राज्यात कोठेही उद्भवलेला नाही. मुंढे यांनी शहरातील अंगणवाड्या बंद करुन अंगणवाडीसेविकांचा उदरनिर्वाह अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. गोरगरीब नाशिककरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुकारलेला या एल्गाराच्या माध्यमातून लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार बोलून दाखविला. मुंढे यांची वागणूक चुकीची आहे. त्यांनी नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांना मान देत शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावे. नगरसेवकांचे हक्क डावलण्याचा प्रयत्न मुंढे यांनी करु नये, असा सल्लाही भुजबळ यांनी यावेळी दिला. सर्वांना सोबत घेऊन लोकशाही पध्दतीने नाशिककरांच्या विकासासाठी निर्णय घ्याल तर स्वागत करु असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, देविदास पिंगळे, शेफाली भुजबळ, गटनेता गजनन शेलार, गुरूमित बग्गा, कविता कर्डक, प्रेरणा बलकवडे, समीना मेमन, सुषमा पगारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यक र्ते व नागरिक उपस्थित होते.