नाशिक : ‘वारे सरकार तेरा खेल, सोने के दाम में मिलता तेल’ अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात दुचाकी वाहने हाताने ढकलत नेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. युवक कार्यकर्त्यांनी शहरातील जुने मध्यवर्ती बसबस्थानक चौकापासून दुचाकी वाहने हाताने लोटत मोर्चा काढला. यावेळी ‘इंधन दरवाढ रद्द करा’ अशा घोषणा देण्यात येऊन माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, देशात दिवसेंदिवस महागाई वाढत असून, कोरोनाचे फक्त निमित्त झाले आहे. इंधन दराची घोडदौड सुरूच असून, घरगुती गॅसचे दर सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही. लॉकडाऊनच्या काळात जून महिन्यात वीसहून अधिकवेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली होती; त्याचीच पुनरावृत्ती सध्या सुरू असून, इंधनाची दरवाढ अशीच सुरू राहिली, तर लवकरच पेट्रोल दराची 'सेंच्युरी' पूर्ण होईल. महागाईचा बाकासूर जाळण्यासाठी अर्थतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच पेट्रोल व डिझेलवरील सेस कमी करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे, चेतन कासव, प्रफुल्ल पवार, बाळा निगळ, शामराव हिरे, जय कोतवाल, गणेश गायधनी, कृष्णा काळे, किरण भुसारे, रामदास मेदगे, राकेश पानपाटील, विशाल डोखे, महेश शेळके, सागर बेदरकर, अक्षय कहांडळ, आदी उपस्थित होते. (फोटो ११ एनसीपी)