नाशिक : विद्यमान संचालकांनी गत संचालकांचा चव्हाट्यावर आणलेला भ्रष्टाचार, संचालक मंडळ विश्वासात घेत नसल्याचा आरोप करून नूतन संचालकांनी सोडलेले व्यासपीठ यामुळे दोन्ही बाजूकडील सदस्यांमधील हमरी-तुमरी, फ्री-स्टाइल, माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न अन् यावर कडी करून गोंधळातच विषय मंजूर करून घेऊन सभा गुंडाळण्याची परंपरा नाशिक डिस्ट्रीक्ट सेकंडरी टीचर्स को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्या नूतन संचालकांनी परंपरेप्रमाणे कायम ठेवली़परशुराम साईखेडकर नाट्यगृहात एनडीएसटीचे नूतन चेअरमन राजेंद्र निकम, उपाध्यक्ष विजया पाटील, कार्यवाह मोहन चकोर, संचालक व सभासदांच्या उपस्थितीत रविवारी (दि़२०) सव्वा अकरा वाजेच्या सुमारास सभेस सुरुवात झाली़ दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर निकम यांनी गत संचालक मंडळाने केलेली बेकायदेशीर नोकर भरती, वेतनवाढ, पदोन्नती, बेकायदेशीर खरेदीची माहिती देऊन भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला़ तसेच सोसायटीचे हे नुकसान गत संचालकांकडून पाचव्या वेतन आयोगानुसार वसूल करणार असल्याचे सांगितले़ निकम यांच्या भाषणादरम्यान दोन्ही बाजूच्या सभासदांनी गोंधळ सुरू करून माईकचा ताबा घेऊन व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला़ या गोंधळातच कार्यवाह मोहन चकोर यांनी गत संचालक मंडळाच्या कारकिर्दीतील २०१४-१५ चे वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचण्यास सुरुवात केली असता लाभांश वाटप वगळून इतर सर्व विषय नामंजूर करण्यात आले़ सभागृहात सुरू असलेल्या प्रचंड गोंधळातच नवीन संचालकांनी २०१५ -१६ चे वार्षिक अंदाजपत्रक मांडून मंजूर करून घेतले़ त्यात टेरिफ पत्रक, नफा-तोटा ताळेबंद मंजुरी, अंतर्गत वैधानिक हिशेब तपासणीसाची नेमणूक यांचा समावेश होता़सर्वसाधारण सभेपूर्वी संचालक मंडळाच्या तीन बैठकांमध्ये विषयपत्रिकेवरील ४ ते ११ क्रमांकाचे विषय नव्हते़ थेट वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांसमोर हे विषय मांडल्याने संचालक मंडळ सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप संजय चव्हाण आऱ के. सावंत, एस़ आऱ देशमुख, डी़ एस़ आदिक, बी़ एऩ काळे, एस़ के.देसले, के. के.गांगुर्डे, श्रीमती डी़ एऩ पवार यांनी केला व ते व्यासपीठावरून थेट सभासदांमध्ये जाऊन बसले़ मालेगाव येथील संस्थेची असलेली जागा विकून उपविभागीय कार्यालयासाठी नवीन जागा घेण्याचा निर्णय, अधिकार नसताना कर्मचाऱ्यांच्या बदल्या, आर्थिक निर्णय यामुळे दोन्ही गटांचे सदस्य आक्रमक झाले. त्यांनी माईकचा ताबा घेण्याबरोबरच अध्यक्षांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला़नाट्यगृहात सुमारे दीड तासापासून सुरू असलेला गोंधळ आटोक्यात येत नसल्याचे पाहून संचालक मंडळाने राष्ट्रगीत सुरू करून अक्षरश: सभा गुंडाळली़ सोसायटीच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांनी जाहीरनाम्यातील एकाही विषयावर चर्चा केली नाही, हे या सभेचे विशेषच ठरले़ (प्रतिनिधी)
एनडीएसटी सभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2015 10:53 PM