नाशिक : त्र्यंबकेश्वर-जव्हार रोडवरील अंबाई फाट्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने सापळा रचून सुमारे ५५ लाख रुपयांचा अवैध मद्यसाठ्यासह ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, दमणमध्ये तयार करण्यात आलेले मद्य त्र्यंबकेश्वर-जव्हार मार्गे नाशिकमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई भरारी पथकाचे निरीक्षक सुभाष जाधव यांना मिळाली होती़ या माहितीनुसार दुय्यम निरीक्षक अशोक तारू, जवान प्रदीप अवचार हे शुक्रवारपासून (दि़ १५) या मार्गावर गस्त घालीत होते़ शनिवारी (दि़ १६) सकाळी सात वाजेच्या सुमारास दमणहून नाशिककडे येत असताना एक ट्रक (आरजे २३, जीए ३०८५) या पथकास दिसला़अंबोली गावाजवळील अंबाई फाटा या ठिकाणी भरारी पथकाने हा ट्रक अडवून पाहणी केली़ या ट्रकमध्ये दमणनिर्मित विदेशी मद्यसाठा आढळून आला़ त्यात १९ लाख ९२ हजार रुपये किमतीचे ४१५ बॉक्स विदेशी मद्य आणि १२ लाख २० हजार ४०० रुपये किमतीच्या दमणनिर्मित १५१ बिअरचे बॉक्स होते़ या ट्रकचा चालक गुलाम मुतुर्झा तोहीद खान (२४, रा़बलिठा, वापी मूळ रा़ उत्तर प्रदेश) व सुनील राजमन दुबे (३२, रा. बलिठा, वापी, मूळ रा़ उत्तर प्रदेश) या दोघांना अटक केली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मद्याची वाहतूक करणारा ट्रक, मद्यसाठा, मोबाइल असा एकूण ५५ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़, तर संशयित दारूमालक धनसुखभाई कांमळी (रा़दमण), ट्रकमालक व इतर दोन संशयितांचा शोध सुरू आहे़ (प्रतिनिधी)
त्र्यंबकेश्वरजवळ ५५ लाखांचा मद्यसाठा जप्त
By admin | Published: July 17, 2016 1:35 AM