नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांनजीक पोहोचली असून, शुक्रवारी (दि. १४) एकूण १,९९६ रुग्ण नव्याने बाधित झाले असून, १,०९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, पुन्हा एकदा कोरोना बळी शून्य असल्याचा दिलासा आहे.
जिल्ह्यात गुरुवारपाठोपाठ दुसऱ्या दिवशी शुक्रवारी बाधित संख्या दोन हजारांनजीक पोहोचली असून, त्यातील १,५०३ बाधित हे नाशिक मनपा क्षेत्रातील, ३५१ नाशिक ग्रामीण, ४२ मालेगाव मनपा तर १०० जिल्हाबाह्य रुग्णांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या ८,७२१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात ६,९४० नाशिक मनपा, १,२५० नाशिक ग्रामीण, १६८ मालेगाव मनपा तर ३६३ जिल्हाबाह्य रुग्णांचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील बळींची संख्या ८,७६६वर कायम आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या प्रलंबित अहवालांची संख्या २,०६५वर पोहोचली आहे. त्यातही सर्वाधिक १,४१६ प्रलंबित अहवाल हे नाशिक ग्रामीणचे, ५६४ नाशिक मनपाचे तर मालेगाव मनपाचे ८५ अहवाल प्रलंबित आहेत.
इन्फो
पाॅझिटिव्हिटी रेट ३९ टक्क्यांवर
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट गुरुवारच्या २५ टक्क्यांवरुन शुक्रवारी ३९.०५ टक्के इतका वाढला आहे. म्हणजेच साधारणपणे नमुना देणाऱ्या अडीच व्यक्तींपैकी एका व्यक्तीला कोरोना असल्याचे अहवालातून निष्पन्न होत आहे. त्यात नाशिक मनपाचा पॉझिटिव्हिटी रेट ३८.८६, नाशिक ग्रामीणचा ३९.५७, मालेगाव मनपाचा २१.११ तर जिल्हाबाह्यचा दर ६३.२९ टक्के इतका आहे.