कळवण : कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी येथील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. २२) मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर गळ्यात कांद्याच्या माळा घालतानाच मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली शासकीय कापूस खरेदी पुन्हा सुरू झाली असली तरी अत्यंत धिम्या गतीने होत आहे. तसेच एफएक्यूच्या फक्त एकाच ग्रेडची खरेदी सुरू आहे. मध्यम व आखूड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरू करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास, भावांतर योजना सुरू करावी या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी एकाच वेळी महाराष्ट्रभर मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी यावेळी दिली. केंद्र शासनाने कांद्याची निर्यातबंदी हटवली आहे व तात्पुरता कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला असला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. केंद्र शासनाने मोठ्या उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. अडचणीत असलेल्या कांदा शेतकºयांना सावरण्यासाठी काहीच केले नाही. नाफेडमार्फत २००० रु पये प्रतिक्विंटल प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा, अशीही शेतकरी संघटनेची मागणी असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकºयांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून कापूस जाळण्याचे आंदोलन केले. यावेळी लॉकडाउनचे सर्व नियम पाळण्यात आले. कांदा व कापूस उत्पादक शेतकºयांच्या भावना व नाराजी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले. आंदोलनात यावेळी मविप्र संचालक अशोक पवार, शेतकरी नेते शांताराम जाधव, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, जगन पाटील, दादा देशमुख, एकनाथ गांगुर्डे, हिरामण वाघ, सुभाष पगार, रमेश बच्छाव, जगन्नाथ पाटील, ज्ञानेश्वर वाघ आदी सहभागी झाले होते.-----तासाभरात दोन आंदोलनसकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान कांदा, मका, द्राक्ष, कापूस प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी मध्यवर्ती इमारतीच्या पायरीवर कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन केले. यावेळी तहसीलदार बी.ए. कापसे यांना निवेदन देत सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, ज्येष्ठ नेते रवींद्र देवरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, छावाचे तालुकाप्रमुख प्रदीप पगार उपस्थित होते. त्यानंतर काही वेळात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोरील आवारात शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी एकत्र येत मूठभर कापूस जाळून कांदा व कापूसप्रश्नी आंदोलन केले.
गळ्यात कांद्याच्या माळा, मूठभर कापसाच्या ज्वाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 8:40 PM