नाशिक : गाव समृद्ध झाले, तर देश समृद्ध होईल. सामाजिक विकास साध्य करण्यासाठी राजकीय वर्चस्वाची आवश्यकता आहे. ग्रामविकास साध्य करण्यासाठी पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज व श्रमदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांची पुण्यतिथी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरी करण्यात आली. या जयंतीच्या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी ‘ग्रामविकास व वसंतराव नाईक’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी कोंडाजीमामा आव्हाड होते. याप्रसंगी पवार म्हणाले, माणसाचं गावातील निसर्गाशी असलेले नाते शहरीकरणामुळे दूर होत गेले. गावातील अंतर्गत राजकीय कलहांमुळे गावे उद्ध्वस्त होऊन विकासापासून दूर जात आहेत. राजकारण हे मतपेटी आणि जातपेटीशी जोडले आहे तोपर्यंत विकास होणार नाही. असे त्यांनी मत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड संस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे व रामचंद्र काकड यांनीही मनोगत व्यक्त केली. प्रास्तविक सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे विश्वस्त धर्माजी बोडके यांनी केला, तर आभार संस्थेचे सहचिटणीस तानाजी जायभावे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. दिलीप कुटे व प्रा. शरद काकड यांनी केले.
पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज : पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:40 PM