नाशिक : न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता हे संविधानाचे चार तत्त्व अभ्यासण्याची गरज आहे. संविधानाचे तत्त्वज्ञान समजून घेत दैनंदिन जीवनात ते अंगिकारल्यास ‘संविधानाचा जागर’ करण्याची वेळ येणार नाही आणि संविधानाला अभिप्रेत असलेल्या राष्टनिर्मितीचे कार्य प्रत्येक भारतीयाकडून होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मंत्रालयातील नियोजन विभागाचे सहसचिव तुकाराम मुंढे यांनी केले.संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि.२५) महाकवी कालिदास कलामंदिरात संविधान सन्मान समितीच्या वतीने आयोजित ‘जागर संविधानाचा’ या परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी मुंढे उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य होते.प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते, सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी उपस्थित होते. यावेळी मुंढे म्हणाले, संविधानाने न्याय तत्त्वांतर्गत सर्वप्रथम देशातील प्रत्येक घटकाला आर्थिक न्याय मिळवून देण्याची तरतूद केली आहे. त्यानंतर सामाजिक, राजकीय न्याय संविधानाने सांगितले आहे. कारण आर्थिक न्याय न मिळाल्यास सामाजिक-राजकीय न्यायदेखील देता येणे अवघड आहे. स्वातंत्र्य तत्त्वामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे; मात्र आपल्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यावर गंडांतर येणार नाही किंवा त्यांच्या संविधानिक अधिकारांवर गदा येणार नाही, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हे आपण विसरून चालणार नाही, असेही मुंढे यांनी यावेळी सांगितले. तसेच स्वातंत्र्य-समता या नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता धर्मनिरपेक्ष भारतातील प्रत्येक घटकाला समान वागणूक मिळाली पाहिजे, असे संविधानाला अभिप्रेत आहे. जेथे समानता नसेल तेथे न्याय होऊ शकत नाही. या तीन तत्त्वांचे संरक्षण करत प्रत्येक बंधुता निर्माण करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, तरच राष्टÑनिर्माणाचे कार्य एक भारतीय म्हणून आपल्या हातून घडेल, असेही मुंढे म्हणाले. दरम्यान, चौधरी, सदावर्ते यांनीही संविधानाविषयी मनोगत व्यक्त केले.
संविधानाचे तत्त्वज्ञान अंगीकारण्याची गरज : तुकाराम मुंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:55 AM