नाशिक : प्रत्येक व्यक्तीत अंगभूत कला असतेच, तसेच प्रत्येकजण कलाप्रेमी असतो. व्यक्तीच्या दैनंदिन वापराच्या वस्तू निवडतानाही त्याचा प्रत्यय येतो. मात्र, कलासाक्षरता नसल्याने अनेकदा त्याचा पुरेसा आनंद घेता येत नाही. त्यामुळे कलेएवढीच कलासाक्षरताही गरजेची आहे, असे प्रतिपादन अहमदनगर येथील ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केले. गोदाघाटावरील वसंत व्याख्यानमालेचे तिसावे पुष्प बुधवारी (दि. ३०) प्रमोद कांबळे यांनी गुंफले, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ चित्रकार शिवाजी तुपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या पुष्पात कांबळे यांनी ‘सर्वांसाठी कला’ या विषयावर मत मांडले. ते म्हणाले, प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या कलेशी नकळत संबंध येतो. व्यक्ती स्वत:साठी कपडे वा अगदी चष्मा घेण्यासाठी बाजारात गेल्यानंतरही अत्यंत काळजीपूर्वक वस्तूची निवड करते. आपण कोणता व्यवसाय करतो, त्या अनुषंगाने कोणता रंग साजेसा ठरेल, वस्तूवरील डिझाइन कशी असावी याचा बारकाईने विचार केला जातो. कलेच्या या अंगभूत जाणिवा वाढविण्याची गरज आहे. बऱ्याचदा रस्त्यावरून जाताना एखादे होर्डिंग आपले लक्ष वेधून घेते, तेव्हा ते तयार करणाºया कलावंताचे यश असते. त्या कलावंताची दृष्टी आपल्याला त्या होर्डिंगकडे खेचून आणते. तथापि, कला व कलासाक्षरता या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. अनेक जण निव्वळ कलासाक्षरता नसल्याने त्यांना स्वत:च्या घराचे इंटिरिअर साकारता येत नाही. त्यामुळे सुशोभिकरणाच्या नादात त्याचा पार शोरूम करून टाकतात. भडक रंगांचा मारा केल्याने त्यात कोंदटल्यासारखे वाटते. त्यामुळे कलासाक्षरता ही स्वानंदासाठीही महत्त्वाची ठरते, असेही कांबळे म्हणाले. यावेळी त्यांनी चित्रकलेची काही प्रात्यक्षिकेही सादर केली. श्रीकांत येवलेकर यांनी प्रास्ताविक केले. चित्रकार मुक्ता बालिगा यांनी शिवाजी तुपे यांना आदरांजली अर्पण केली. श्रीकांत बेणी यांनी कांबळे यांचा परिचय करून दिला. आजचा कार्यक्र म, कलावंत : प्रांजली बिरारी-नेवासकर , सादरीकरण : वसंत स्वरमाला
कलेइतकीच कलासाक्षरतेची गरज : प्रमोद कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:55 AM