नाशिक : सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी ललिता वीर यांनी केले आहे. सद्यस्थितीत अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षण शाखेच्या विद्यार्थ्यांची वाईट अवस्था असून, शैक्षणिक गुणवत्ता असूनही केवळ प्रत्यक्ष कामाचे कौशल्य विद्यार्थ्यांकडे नसल्याने त्यांना करिअरच्या अनेक संधी गमवाव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले.द्वारका परिसरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मराठा समाज उत्कर्ष संस्था व मराठा समाज ‘सय’ सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळ यांच्यातर्फे संयुक्तरीत्या मराठा समाजातील दहावी व बारावीच्या सुमारे दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, एन. एस. शिंदे, शंकरराव टाकेकर, डॉ. अनिकेत ढोबळे, अनिकेत गाढवे उपस्थित होते. यावेळी ललिता वीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शिक्षण घेतानाच संबंधित क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला. यावेळी मराठा समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष बापू चव्हाण, मराठा समाज ‘सय’ सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय खैरे, अध्यक्ष यशवंत शिंदे, हिरामण वाघ, प्रभा प्रभाणे, नानासाहेब जगताप आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक अरुण पळसकर यांनी केले, तर अरुण मोरे यांनी आभार मानले.मोबाइलचे दुष्परिणामप्राचार्य एन. एस. शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाइल आणि इंटरनेटच्या जाळ्यातून बाहेर पडण्याची गरज व्यक्त केली. मोबाइचा अमर्याद आणि अवास्तव वापर विद्यार्थ्यांकडून होत असून त्याचा उच्च शिक्षणातील गुणवत्तेवर दुष्परिणाम होत आहे. मोबाइलच्या दुष्परिणामामुळेच दहावी व बारावीचे विद्यार्थ्यांच्या तुलनेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरताना दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
कौशल्यनिपुण बनण्याची गरज : ललिता वीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 1:01 AM