नाशिक : कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात रोजगार मेळाव्याच्या माध्यमांतून विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असले तरी कौशल्यनिपुण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असून यात महिलांचाही समावेश वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नाशिकमधील विविध व्यवसाय प्रशिक्षण संस्थातर्फे जिल्हा नियोजन भवन येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य मार्गदर्शन व सन्मान सोहळयात त्या बोलत होते.व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनिल सैंदाणे, सहायक संचालक संपत चाटे, महिंद्रा अॅँड महिंद्राचे उप महाव्यवस्थापक जितेंद्र कामठीकर, कौशल्य विकास अधिकारी अशोक चव्हाण, बाळासाहेब जाधव, सागर भाबड आदी उपस्थित होते. यावेळी आमदार फरांदे यांनी देशाची वाढती लोकसंख्या ही देशाची ताकद असल्याचे सांगतानाच आगामी काळात भारत हा मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ असणारा देश असेल, असा विश्वास व्यक्त केला. तर देशातील लोकसंख्येच्या ६० टक्के असलेल्या तरु णांमध्ये भविष्यातील भारत घडविण्याचे सामर्थ्य असल्याचे सांगतानाच कौशल्यनिपूण तरु णांनी प्रशिक्षण घेवून स्वयंरोजगार सुरू करावा असे आवाहन आमदार सीमा हिरे यांनी केले. दरम्यान, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक रोजगार मिळवून देणाऱ्या संस्था आणि रोजगार प्रोत्साहन योजनेत रोजगारक्षम प्रशिक्षणाचा जास्त लाभ देणाऱ्या उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.
कौशल्य विकास जनजागृती फेरी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नाशिकमधील विविध व्यवसाय प्रशिक्षण संस्थातर्फे शहरातून कालिदास कलामंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कौशल्य विकास जनजागृती रॅली काढण्यात आली. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीत विद्यार्थ्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ‘यंग इंडिया, स्कील इंडिया’, कौशल्यनिपुन महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट आदि घोषणा देत जनजागृती रॅलीत सहभाग घेतला.