नाशिक : पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, कष्टकऱ्यांच्या हातावर उभी आहे, असे संपूर्ण जगाला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाशिक शहरात भव्य स्मारक उभारून तेथे त्यांच्या ग्रंथसंपदेचे दालन करावे. शाहीर लोककला चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्मारकात सभागृह असावे, या ठिकाणी विविध लोककलावंतांनी उपक्र म राबवावेत, अशी अपेक्षा लोककलावंत चळवळीतील कार्यकर्ते व लोककला अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.साहित्य, कला, राजकारण आणि समाजसुधारणा अशा चौफेर क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात वेगवेगळ्या विषयांवर सुमारे पाऊणशे पुस्तके लिहिली आहेत. इतकेच नव्हे तर डाव्या विचारसरणीच्या कामगार चळवळीला मोठे योगदान दिले आहे. कंपनी कामगार असो की रस्त्यावरचा श्रमिक, बांधकाम मजूर, शेतमजूर या सर्वांसाठी अण्णा प्रेरणास्थान असून, त्यांचा शहरात केवळ एक पुतळा उभाण्यात आलेला आहे. नाशिक शहरात अनेक थोरामोठ्यांची स्मारके असून, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचेदेखील उचित स्मारक व्हावे, तसेच या स्मारकात लोककलेच्या अभ्यासासाठी भव्य दालन उभारावे, अशी आग्रही मागणी त्यांच्या विचारांचे पाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी केली आहे. अण्णा भाऊ साठे स्मृती मंडळाचे अध्यक्ष दशरथ मानवतकर यांनी सांगितले की, अण्णा भाऊ साठे यांची ओळख नव्या पिढीला व्हावी तसेच त्यांचे विचार व कार्य पोहोचण्यासाठी प्रत्येक शहरात वसाहतीत उद्योग स्मारक उभारावे, अशी मागणी होत आहे. लोककलावंत संघटनेचे संजय पंचरस म्हणाले की, पुणे, बिबेवाडी येथे अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभे राहिले आहे. त्यासारखे स्मारक नाशिक शहरातदेखील व्हावे, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भरत जाधव व अण्णा भाऊ साठे समाजसेवा फाउण्डेशनचे दिनकर लांडगे, मातंग संघर्ष समितीचे संस्थापक अशोक साठे आदींसह अनेक संघटनांच्या अधिकाऱ्यांनी अण्णा भाऊ साठे स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी शासनाकडे मागणी केली आहे.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना स्वतंत्रपूर्व, स्वातंत्र्यानंतरच्या काळातदेखील समाजातील वंचित घटकांसाठी सतत कार्य केले. सर्वच मागासवर्गीयांचा विकास व्हावा, म्हणून त्यांचे योगदान राहिले आहे. याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र मातंग संघर्ष समिती, मातंग समाज संघटना, बहुजन रयत परिषद, अण्णा भाऊ साठे जागृती संघ, अण्णा भाऊ साठे फाउण्डेशन, लहू शक्ती संग्राम परिषद, साठे समाजसेवा फाउण्डेशन यासह १४ संघटनांनी केली आहे. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशीदेखील मागणी काही सामाजिक संघटनांनी केली आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक उभारण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 5:31 PM
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, कष्टकऱ्यांच्या हातावर उभी आहे, असे संपूर्ण जगाला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाशिक शहरात भव्य स्मारक उभारून तेथे त्यांच्या ग्रंथसंपदेचे दालन करावे. शाहीर लोककला चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्मारकात सभागृह असावे, या ठिकाणी विविध लोककलावंतांनी उपक्र म राबवावेत, अशी अपेक्षा लोककलावंत चळवळीतील कार्यकर्ते व लोककला अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
ठळक मुद्देलोककलावंतांची अपेक्षा भारतरत्न पुरस्कारासाठी साकडे