नाशिक : आजची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बघता समाजाला दिशा देण्याची आवश्यकता आहे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कुठल्याही तत्त्वाशी तडजोड करणे योग्य नसून विचारसरणीच प्रामाणिक असल्याचे मत अलाहाबाद उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश दिलीपराव भोसले यांनी व्यक्त केले. शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. दौलतराव घुमरे लिखित ‘होमेज टु मार्टिस’ (शहिदांना वंदना) आणि काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘लॉयर’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा शनिवारी येथील रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. यावेळी भोसले बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष अॅॅड. जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजीत मोरे, विशेष सरकारी वकील अजय मिसर, अॅड. अण्णासाहेब भोसले आदी उपस्थित होते.सध्याच्या न्याय व्यवस्थेस वेठीस धरण्याचे प्रयत्न केले जातात, त्याविषयी भोसले यांनी खंत व्यक्त केली. बेकायदेशीर आणि अनैतिक कारणांसाठी न्याय व्यवस्थेस वेठीस धरणे चुकीचे असून, त्यामुळेच चांगले आदर्श समाजात प्रस्थापित होण्याची गरज यावेळी व्यक्त केली. देशाच्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आदी क्र ांतिकारकांवर आधारित या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना अॅड. भोसले यांनी माणसे मोठी होत नसतात तर त्यांचे विचार मोठे असतात, असे सांगितले. यावेळी अॅड. जयंत जायभावे यांनी प्रास्ताविक केले, तर अॅड. शशिकांत पवार, ऐश्वर्या घुमरे आणि न्यायाधीश रणजित मोरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
समाजाला दिशा देणे गरजेचे - दिलीपराव भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:10 AM