नाशिक : विभागात गटशेतीच्या उत्पादन ते विक्र ी यामधील विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांनी अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली आहे. नाशिक व परिसरात गटशेती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आता लोकसहभाग वाढत आहे. सद्यस्थितीचा विचार करता गटशेतीवर विशेष भर देण्याची गरज आहे. नाशिकचा गटशेती प्रकल्प राज्यभर राबविल्यास शेती व्यवसायास गती मिळणार असून, त्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होईल, असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक डॉ. कैलाश मोते यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, कृषी विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषिविद्याप्रमुख डॉ. मधुकर धोंडे आदि उपस्थित होते. मोते म्हणाले की, शासनामार्फत गरजानुरूप बऱ्याच योजना असून, प्रकल्प स्वरूपात त्या पुढे आणणे गरजेचे आहे, जेणेकरून सर्वंकष गरजा भागविता येतील. नाशिकसारख्या आदिवासीबहुल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नागली व वरईसारखी पिके घेतली जातात; परंतु त्यांच्या प्रक्रि या उद्योगावर भर दिला जात नाही. विस्तार यंत्रणांनी पीकनिहाय गरजा ओळखून त्यानुसार सर्वांगीण विकास योजना तयार करून प्रभावीरीत्या त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनीही योजना तयार करण्यापासून ते अंमलबजावणीपर्यंत आपला कार्यशील सहभाग नोंदविण्यासाठी पुढे यावे, असेही मोते यांनी सांगितले. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांनी केले. केंद्राचे विस्तार शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश कदम यांनी आभार मानले. प्रदर्शनात कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, दुग्धव्यवसाय विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, रेशीम उद्योग विभाग, महाराष्ट्र बँक तसेच अनेक कृषी उद्योजकांनी सहभाग नोंदवला. (प्रतिनिधी)
गटशेती प्रकल्प राज्यभर राबविण्याची गरज
By admin | Published: January 15, 2015 12:03 AM