नाशिक : शिक्षण, संशोधनाने अंधार दूर होऊन समाज प्रकाशमान होतो. संशोधन समाजोपयीगी, दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणारे हवे. तसेच नवीन पिढीत संशोधनाचे संस्कार रुजविणे त्यांची संशोधन वृत्ती वाढविणे आपले कर्तव्य आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही अभ्यासूवृत्ती जोपासत संशोधनाची चव चाखावी, असे आवाहन डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केले.
नीलवसंत मेडिकल फाउंडेशनतर्फे डॉ. बावस्कर यांना २०२०चा वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मविप्र संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात पुरस्काराला उत्तर देताना डॉ. बावस्कर बोलत होते. एक लाख रुपये, मानपत्र, स्मन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यासपीठावर मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सुरेश पाटील, डॉ. व्ही. बी. गायकवाड, वसंत खैरनार, डॉ. प्राची पवार, प्र. द. कुलकर्णी, शशी जाधव उपस्थित होते.
डॉ. बावस्कर म्हणाले, देह ठेवण्यापूर्वी मातृभूमीसाठी काय केले, हे प्रत्येकाला सांगता यायला हवे काम करण्याची गरज आहे. मातृभूमीसाठी जागतो तोच खऱ्या अर्थाने जगतो. कोरोनाकाळात अनेक डॉक्टरांनी रुग्णांवर दूरवरूनच उपचार केले. रुग्णांची तपासणीदेखील केली नाही. हे दुर्दैव असल्याचे सांगत दोन वर्षांत कोरोनाच्या अडीच हजार रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले. आयुष्यभरात रुग्णसेवा करताना अनेक विषयांचा शास्त्रीय अभ्यास करून शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्याचा जगभरातील रुग्णांना लाभ होत असल्याचा आनंद आहे. डॉक्टरांनी रुग्णांच्या समस्या ओळखून उपचार करायला हवेत, असे डॉ. बावस्कर यांनी सांगीतले. चंद्रकांत संकलेचा यांनी डॉ. बावस्कर यांचा परिचय करून दिला. विजय कोठारी यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी आभार मानले.
----इन्फो
रुग्णसेवा हे ध्येय समोर ठेवून डॉ. बावस्कर यांनी आयुष्यभर काम केले. रुग्णसेवा म्हणजे तीर्थभेट समजून कोविडकाळात आम्ही अडीच हजार रुग्णांवर यशस्वी उपचार केले. त्यापैकी एकही रुग्णाला रेमडेसिवीर दिले नाही, असे सांगत डॉ. बावस्कर यांच्या पत्नी डॉ. प्रमोदिनी बावस्कर यांनी केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा दिला.