नाशिक : भारताला तीनही बाजूंनी समुद्रकिनारे लाभलेले असल्यामुळे भारत नशीबवान आहे; मात्र अद्याप या समुद्रकिनाऱ्यांचा आपण कधीही चांगला उपयोग करुन घेतला नाही. सागरी सुरक्षेसाठी नौदल, सागरी पोलीस दल, तटरक्षक दल, गुप्तहेर संस्था अशा सर्वच संरक्षण दलांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण मुंजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प महाजन यांनी ‘सागरी सुरक्षा : आव्हाने व उपाययोजना’ या विषयावर गुंफले. यावेळी महाजन म्हणाले, भारत पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होत आहे, यात शंका नाही. भारताची बाह्य सुरक्षा व अंतर्गत सुरक्षा या दोन्ही बाबींचा विचार केला तर भारत चीनच्या तुलनेत अंतर्गत सुरक्षेत मागे पडलेला आहे. त्याचाच फायदा पाकिस्तानकडून १९७१ नंतर उचलला जात आहे. अंतर्गत सुरक्षा पोखरलेली असल्यामुळे पाकिस्तानने नियंत्रण रेषेपलीकडून अपारंपरिक युद्ध दहशतवादी भारतात पाठवून सुरू केले आहे. हे युद्ध सामान्य माणसांवर लादलेले आहे. भारत शत्रूंच्या बाबतीत भाग्यवान म्हटला पाहिजे. आपल्या देशाला सर्व प्रकारचे शत्रू आहेत. भारताची सागरी सीमा ७ हजार ६०० किलोमीटर इतकी आहे. अंदमान निकोबार, लक्षद्वीप सागरी सीमेवर आहे. ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारताची सागरी सीमा पसरलेली आहे.परदेशी मासेमारी रोखाभारताने सागरी सुरक्षेचा विचार करता अंदमान-निकोबार, लक्षद्वीप बेटांच्या परिसरात भारतीय सागरी सीमेअंतर्गत घुसखोरी करुन श्रीलंका, थायलंड या देशांमधील लोक मासेमारी करतात. ही मासेमारी नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. तसेच बांग्लादेशी घुसखोरीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यासाठी आतापासूनच भारताने ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे महाजन यावेळी म्हणाले.
सागरी सीमा सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्न हवे : महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:04 AM