नाशिक : शहरात फोफावलेल्या डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्या तरी नागरिकांच्या घरातच डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळत असल्याने निष्काळजी नागरिकांना दंड करण्याची गरज आहे, याचा पुनरुच्चार वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. नागरिकांना दंड करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळल्यानंतर कुलकर्णी यांनी समितीला पत्र दिले असून, निर्णयाचा फेरविचार करा, असा सल्ला दिला आहे. नाशिक शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून, आता ही संख्या साडेतीनशेच्या वर गेली आहे. महापालिकेच्या वतीने यासंदर्भात डास निर्मूलनाची कार्यवाही केली जाते परंतु तरीही डेंग्यूू रुग्ण आढळल्यानंतर नागरिक महापालिकेकडे तक्रार करतात. वस्तुत: नागरिकांच्या तक्रारीवरून परिसराची तपासणी केली असता संबंधित नागरिक किंवा त्यांच्या घराच्या आसपास नागरिकांच्या घरातच फ्रीज, पाणीसाठा, फुलदाण्यात, झाडांच्या कुंड्या यामध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडतात. जे नागरिक स्वत: दक्षता घेतात, त्यांना अन्य निष्काळजी नागरिकांमुळे रोगराईला सामोरे जावे लागते. त्यामुळे डेंग्यूचे डास आढळतील अशा नागरिकांना दंड करण्याची मागणी सतीश कुलकर्णी यांनी आरोग्य समितीत केली होती. प्रशासनाने याबाबत प्रति डास उत्पतीस्थानासाठी पाचशे रुपयांचा दंड करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला होता. मात्र समितीने प्रशासनावर दोषारोप करीत हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांना पत्र पाठविले असून, दंड करण्याच्या प्रस्तावाचा फेरविचार करावा, अशी मगणी केली आहे.पेस्ट कंट्रोल ठेक्याचा फेरविचार करावापेस्ट कंट्रोलचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून बेजाबबदारपणे काम होत असून, त्याचादेखील विचार करावा, असे कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनादेखील कुलकर्णी यांनी पत्र दिले असून, सध्या हिवताप निर्मूलन विभागात अपुरे कर्मचारी असून, डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी भरून कामकाज करावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
नागरिकांना दंड करण्याची गरज : सतीश कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 1:05 AM