येवला : मागील १५ वर्षांपासून राज्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र पाणी, वीज, रस्ते, आरोग्य शिक्षण, हे मूलभूत प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे आता राज्य सरकारला उलथवण्याची गरज आहे. न्याय हक्क हिरावून घेणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेला एकहाती सत्ता द्या, मग बघा भ्रष्टाचाऱ्यांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येवला येथील जाहीर सभेत बोलताना केले. येवला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ शहरातील गोशाला मैदानावर ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनाचा नाकर्तेपणा व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. २००९च्या विधानसभेच्या वेळी येवल्यात पाऊस असल्याने हेलिकॉप्टर येऊ शकले नाही, पण विरोधकांनी सेनेने मांडवली केल्याची अफवा उठविली. मांडवली करणाऱ्यांमधली शिवसेना नाही असा खुलासा करतानाच नॉलेज सिटीला स्वत:चे नाव दिले तेव्हा समतेचा आव आणणाऱ्यांना सावित्रीबाई फुले आठवल्या नाही का? असा सवाल त्यांनी केला. इजिप्त व अफगाणमधील कांदा आयात होतो आहे.शेतकरी हितासाठी आपण आंदोलन केले पाहिजे ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी मांडली. परंतु केंद्रात आपले सरकार असल्याने थेट आंदोलन करण्यापेक्षा केंद्र सरकारला कांदा उत्पादकांची व्यथा सांगू व चर्चा करू, असे मी सांगितले. पण, शेट्टी व खोत यांनी चर्चे अगोदरच कृषिमंत्र्याचा पुतळा जाळला आणि ठिणगी पडली तरी पुन्हा शेवटी हे दोघेही भाजपाच्या दावणीला गेले असल्याचे ते म्हणाले. हे दोघे गेले असले तरही शेतकरी शिवसेनेबरोबर असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. आम्हाला शहरीबाबू म्हणून हिणवणारे शरद पवार यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे दोन पैसे मिळू दिले नाही व खऱ्या अर्थाने पवारांनीच शेतकऱ्यांना लुटले असल्याचा घणाघाती आरोप ठाकरे यांनी केला. आम्हाला शेती कळत नसली तरी शेतकरी कळतो,अशी कोपरखिळी ठाकरे यांनी मारली.माजी आमदार मारोतराव पवार यांनी भुजबळांच्या पुनर्वसनाचा येवल्यातील करार संपला आहे. तो आता जनताच रद्द करेल, असे भावनिक आवाहन केले. भुजबळ यांनी केवळ आप्तस्वकियांचा विकास केला, अशी टीका शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांनी केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. (वार्ताहर)
राज्य सरकारला उलथवण्याची गरज
By admin | Published: October 11, 2014 12:25 AM