नाशिक : देशातील विद्यार्थी मोठ्या संख्येने चीन, युक्रेन, रशिया आणि इतर देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. त्यांच्यासाठी भारतात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अधिक परिसंस्था निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच, भारतातील आयुर्वेद आणि इतर आयुष विषयांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्यासाठी परदेशातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे राज्यपाल बैस यांनी भेट देऊन विद्यापीठाचा आढावा घेतला. यावेळी राज्यपाल बैस म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसोबतच आजच्या काळात मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने मानसिक आरोग्यावर भर देऊन त्याबाबत अभ्यास होणे देखील गरजेचे असल्याचे राज्यपाल बैस यांनी सांगितले. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य विषयक अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे, असे राज्यपाल बैस यांनी सांगितले.
गंभीर स्वरूपातील आरोग्य सेवांच्या आव्हानांचा सामना करण्याकरिता संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी प्राध्यापक व संशोधकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ समाजाचा एक भाग असल्याने विद्यापीठाने आरोग्य सेवा व लोकांच्या समस्यांबाबत संवेदनशील असले पाहिजे. आयुर्वेद, युनानी, सिद्धी आणि होमिओपॅथी यासारख्या आयुषच्या इतर शाखांचेही अनेकविध फायदे असून आरोग्य विद्यापीठाने वंचित नागरिकांसाठीदेखील वैद्यकीय आणि आरोग्य शिक्षण कार्यशाळा आणि शिबिरांचे नियमितपणे आयोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.