नाशिक : महाराष्ट्राच्या रक्तात हिमोग्लोबिनपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हजारो पटींनी अधिक आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. मात्र तरी या भूमीत शेतकरी आत्महत्या का करतो? महिलांवर अत्याचार का होतात? हे प्रश्न चिंताग्रस्त करतात. महाराष्टला छत्रपती शिवरायांचे चरित्र माहीत आहे, मात्र त्यांचे चारित्र्य अद्यापही समजून घेण्याचा प्रयत्न समाजात झालेला दिसून येत नाही, अशी खंत प्रा. संदीप जगताप यांनी व्यक्त केली.गोदाघाटावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचे २२वे पुष्प जगताप यांनी ‘शिवशाही ते लोकशाही’ या विषयावर बुधवारी (दि.२२) गुंफले. यावेळी ते म्हणाले, देशाच्या वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक अवस्था पुनर्जिवीत करण्याची खरी गरज आहे. त्याशिवाय भारतात परिवर्तन घडणे अशक्यप्राय बाब आहे. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवराय, शहीद भगतसिंग यांच्या वाट्याला किती आयुष्य आले आणि त्यांनी ते कसे जगले, याचा आपण कधी विचार केला नाही किंवा तशी गरजही वाटली नाही, म्हणूनच आज समाजात मागासलेपण वैचारिक दारिद्र्य पहावयास मिळत आहे, हे दुर्दैवाने सांगावे लागते. त्यांनी जसे आयुष्य जगले त्यामधून क्रांती घडविली आणि इतिहास लिहिला गेला, हे समाजाला विसरून चालणार नाही, असे जगताप यांनी यावेळी सांगितले. वैचारिक अवस्था, महामानवाच्या चरित्रातून चारित्र्य समजून घेतल्याशिवाय आपला देश, समाज पुढे जाऊ शकणार नाही. मनशुद्धी करण्याची गरज आहे. मनाची जागा मोठी करून संकुचित वृत्ती सोडावी लागेल. तरच लोकशाहीची वाटचाल शिवशाहीकडे होईल, असे जगताप म्हणाले.आजचे व्याख्यानवक्ते : मंगेश पंचाक्षरीविषय : तुमची रास तुमचा स्वभाव
शिवरायांचे चारित्र्य समजून घेण्याची गरज : संदीप जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:44 AM