अझहर शेख, नाशिक: खरीप हंगामासाठी पिकांना सिंचनाकरिता पाणीपुरवठा पाटबंधारे खात्याकडून केला जाणार आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर, दिंडोरी या पाच तालुक्यांकरिता ३३ टक्के पाणीसाठी उपलब्ध झाला आहे. यामुळे शेतकरी, पाणी वापर संस्थांनी येत्या १५ तारखेपर्यंत जवळच्या सिंचन शाखेत अर्ज सादर करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील वरील पाच तालुक्यांमधील १९ लघु प्रकल्पातील व १० कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ३३ टक्के पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगाम २०२३-२४ करिता पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावर्षी धरणात व लघु तलावांमध्ये जसजसा पाऊस पडून नवीन पाण्याचा साठा उपलब्ध होईल, त्या पाणीसाठ्याच्या अनुमानानुसार चालू खरीप हंगामातील विहिरीवरील पिके व पेरणी झालेली चारा पिके, अन्नधान्य, कडधान्य व तेलबियांची पिके यांना नमुना क्रमांक-७च्या अटी व शर्तीनुसार पाणी पुरविले जाणार आहे. सहकारी पाणीवापर संस्थेच्या लाभक्षेत्रात नमुना क्र-७ची मंजुरी आवश्यक राहणार नाही. या उपलब्ध होणाऱ्या पाण्यात तेलबिया व चारा पिकास प्राधान्य असणार असून पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन मंजुरी देण्यात येईल.
...तर मंजुरी होऊ शकते रद्द
पाणीपुरवठा करतांना पाऊस कमी झाल्यास किंवा धरणातील पाणीसाठा कमी झाल्यास अथवा आपत्ती म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याची आवश्यकता भासल्यास अशावेळी दिलेले परवाने व मंजुरी रद्द करण्यात येईल. याबाबत कोणतीही नुकसान भरपाई देण्यात येणार नाही अथवा त्याअनुषंगाने न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही शहाणे यांनी स्पष्ट केले आहे.
पाणीचोरी खपवून घेणार नाही
शेतपीक सिंचनासाठी कालव्यांवरील मंजूर उपसाधारकांशिवाय अन्य कोणीही पाण्याचा उपसा अवैधमार्गाने करताना आढळून आल्यास पाटबंधारे खात्याकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहाणे यांनी दिला आहे. कालव्यांमध्ये पाणीचोरीसाठी कोणीही इलेक्ट्रिक मोटारी, डिझेल, ऑइल इंजिन ठेवून अथवा पाइपलाइन, डोंगले टाकून पाणी चोरी करू नये, असे करताना आढळून आल्यास साहित्य जप्ती भरारी पथकाद्वारे केली जाईल.