नाशिक : - सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी समाजात सजगता निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी सकारात्मक विचार जागृत ठेवून कार्य करणे महत्त्वपूर्ण असल्याचा सूर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-१९ आजारासंदर्भात जनजागृती विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेत उमटला.
आरोग्य विद्यापीठातर्फे आयोजित कार्यशाळेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवाणी, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी भरत वटवाणी यांनी आरोग्य शिक्षणातील सर्वांनी समाजभान जागृत ठेवून कार्य करावे. रुग्णांशी आदराने वागावे, तसेच भावनिक नाते जोडावे, असे आवाहन केले. नव्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग करणारे व ज्यांचे रॅगिंग होते अश्या विद्यार्थ्यांनी त्याच्या परिणामाबद्दल सजग रहाणे आवश्यक आहे. रॅगिंग ही थोड्या वेळाकरिताची मजा असते; मात्र त्याचे सामाजिक, कायदेशिर, मानसिक परिणाम नव्या विद्यार्थ्यांवर होत असतात, याचा विचार करून विद्यापीठाने दिलेल्या सर्व बाबींची खबरदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःला अधिक कणखर आणि सामर्थ्यवान बनवावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या कार्यशाळेस कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक संदीप कुलकर्णी ऑनलाइन उपस्थित होते.