नाशिक : जिल्ह्यातील डॉक्टर्ससह सर्व आरोग्य यंत्रणा कोविड काळातील सततच्या श्रमाने दमल्याने तसेच सध्या कोविड रुग्णसंख्या कमी असल्याने खासगी हॉस्पिटल्समधील कोविड रुग्ण भरती बंद करण्याचे सूतोवाच करणाऱ्या हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनला जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी साथरोग कायद्यानुसार रुग्णांवर उपचारास नकार देता येणार नसल्याचे बजावल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत रुग्ण उपचार पूर्ववत सुरू ठेवण्याची तयारी दर्शवली.
खासगी हॉस्पिटल्सनी कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय घेऊन हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनकडून त्याबाबतचे निवेदन थेट मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून बरीच चर्चा झाली. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांनी संबंधित रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा पवित्रा स्वीकारल्याने हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनला भूमिकेत बदल करीत निर्णय माघारी घेत असल्याचे प्रशासनाला स्पष्ट केले. संघटनेने जाहीर केलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२) महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेत त्यांची कैफियत मांडली. या बैठकीत असोसिएशनचा संपूर्ण रोख आम्ही केवळ परवानगी मागितली होती, तसेच शहरातील काही स्वयंघोषित आरोग्यदूतांकडून होत असलेल्या दबावाबाबत होता. यावेळी बोलताना असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. राज नगरकर म्हणाले की, चुकीचे कामकाज करणाऱ्या रुग्णालयांचे आम्ही अजिबात समर्थन करत नाही. तसेच त्याचबरोबर मनपाकडून होत असलेल्या बिलांच्या ऑडिटलाही आमचा विरोध नाही. मात्र, कोरोनासारख्या महामारीच्या काळात सेवा देणारे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णालयांना भयविरहित रुग्णसेवा करू देणे आवश्यक आहे. कोणी डोक्यावर बंदूक ठेवून आणि दबावतंत्राचा वापर करत असेल तर काम कसे करणार? असा प्रश्न नगरकर यांनी उपस्थित केला. अशा संबंधित व्यक्तींपासून आम्हाला संरक्षण द्यावे, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे डॉ. नगरकर यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, सचिव डॉ. सचिन देवरे, खजिनदार डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ. समीर अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
अयोग्य वर्तणूक अमान्य
रुग्णालय किंवा बिलाविषयी कुणाची तक्रार असेल तर त्यांनी मनपाने नेमलेल्या ऑडिटर्सकडे तक्रार करावी. त्यासाठी मनपाकडून प्रत्येक रुग्णालयाबाहेर नोटीस लावण्यात येणार आहे. रुग्ण व नातेवाइकांनी योग्य मार्गाने तक्रार करावी त्यास आमची हरकत नाही. परंतु, कोणी अरेरावी करणे, धमकी देणे अशाप्रकारची अयोग्य वर्तणूक केल्यास संबंधितांविरोधात पोलीस आणि मनपा प्रशासनाकडे तत्काळ तक्रार करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील आणि डॉ. नगरकर यांनी सांगितले.
इन्फो
उपचारास नकार देता येणार नाही
यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले की, साथरोग कायद्यानुसार रुग्णांवर उपचारास नकार देता येणार नसल्याचे डॉक्टरांना बजावले असून, बिल आणि रुग्णांविषयी चुकीचे काम करणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध कारवाई केली जाईल. तसेच डॉक्टरांवर दबाव आणल्यास संबंधित व्यक्तींविरुद्धदेखील प्रशासन कडक कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. बिलाबाबत कुणाची तक्रार असल्यास त्यांनी रितसर तक्रार करावी. तसेच भविष्यातदेखील शासनाने दिलेल्या नियमानुसार ऑडिट करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
-