नाशिक : महापालिकेत सत्ताधारी असूनही विकासकामांबाबत होणारी उपेक्षा आणि निर्णयप्रक्रियेत महापौरांकडून डावलले जात असल्याने नाराज झालेले मनसेचे गटनेते अशोक सातभाई यांनी आता थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यापुढ्यात गाऱ्हाणे मांडण्याचे ठरविले असून, लवकरच ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सातभाई यांनी म्हटले आहे.प्रभागांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून विकासकामे खोळंबल्याने सत्ताधारी मनसेसह सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मनसेचे गटनेते अशोक सातभाई यांनी २० जानेवारीला झालेल्या महासभेत सदर नगरसेवक निधीचा मुद्दा उपस्थित होऊन तब्बल सहा तास त्यावर चर्चा झडली होती. अखेर महापौरांनी प्रत्येक नगरसेवकाला ५० लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आयुक्तांकडून केवळ ३० लाखांच्याच कामांना मंजुरी दिली जात असल्याची चर्चा व्हायला लागल्यावर मनसेचे गटनेते सातभाई यांनी याबाबत महापौरांसमवेत आयुक्तांची भेट घेण्याचे जाहीर केले होते. परंतु महापौरांनी गटनेत्यांना डावलून उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींना घेऊन आयुक्तांची भेट घेतल्याने सातभाई नाराज झाले. याशिवाय राजगड येथे झालेल्या मनसेच्या नगरसेवकांच्या बैठकीतही सातभाई यांची महापौरांसमवेत खडाजंगी उडाली. याचवेळी सातभाई यांनी राजीनामा देण्याचाही इशारा दिला होता. परंतु महापौरांनी समजूत काढत त्यांना परावृत्त केले. दरम्यान, या साऱ्या प्रकाराबाबत सातभाई यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे कारभाराचा पाढा मांडण्याचे ठरविले आहे. सातभाई यांनी उत्पन्नात वाढ कशी करायची याची अंमलबजावणी प्रशासनाने करायची असून, कोणत्याही परिस्थितीत नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये कामे होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेत सत्ताधारी असूनही विकासकामांबाबत उपेक्षा
By admin | Published: February 04, 2015 1:45 AM