दिलीप निफाडे
शिरवाडे वणी : कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणादायी स्मारकाचे काम त्यांची मायभूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात पूर्णत्वाला जाऊ शकलेले नाही. स्मारकाचे काम रखडल्याने गावकऱ्यांमध्ये उपेक्षेची भावना असून शासनाने स्मारक पूर्णत्वाला न्यावे, अशी मागणी होत आहे. नाशिकपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले शिरवाडे वणी हे ४० वर्षांच्या मागील कालखंडात संपूर्ण महाराष्ट्रात चोरांचे शिरवाडे म्हणून प्रसिद्ध होते. मात्र, या गावाची ओळख कुसुमाग्रजांमुळे कुसुमाग्रजांचे शिरवाडे म्हणून बनली आहे. कुसुमाग्रजांचे त्यांच्या मायभूमीत स्मारक व्हावे यासाठी अशोक निफाडे यांनी स्मारकाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि शिरवाडे वणी ग्रामपंचायतीमार्फत नोव्हेंबर २००४ मध्ये पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सातत्याने तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत साडेबारा लाख रुपयांचा निधी कसाबसा पदरात पडला आणि त्या निधीतून सन २००७ मध्ये राष्ट्रीय महामार्गालगत स्वागत कमान व गावालगत स्मारक परिसराला संरक्षक भिंत तसेच पाण्याची टाकी, स्मारक परिसरात काँक्रिटीकरण आदी कामे करण्यात आली. राज्यसभेतील खा. बाळ आपटे यांच्या निधीतूनही १० लाख रुपये निधी उपलब्ध करून कुसुमाग्रज वाचनालयाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, स्मारक परिसरातील स्वच्छतागृह, सांस्कृतिक सभागृह व अन्य कामे रखडलेली आहेत. त्यामुळे स्मारकाच्या उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.केवळ आश्वासनांचा पाऊसपहिल्या टप्प्यातील कामे सुरू झाल्यानंतर गावात लोकप्रतिनिधींची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू झाली होती. निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक, राजकीय पातळीवरील पुढारी व नेत्यांची अहमहमिका लागली होती. परंतु, स्मारक परिसरात विविध कार्यक्रमांच्या वेळी फक्त आश्वासनांचा पाऊस पडला. आता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील नवनिर्वाचित सदस्यांनी सदर काम पूर्णत्वास न्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.लोकहितवादी मंडळाकडे लक्षनाशिक येथे कुसुमाग्रजांनीच स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाच्या वतीने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविले जाणार आहे. या संमेलनासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी संकलित होणार आहे. शासनानेही ५० लाख रुपये अनुदान दिले आहे. लोकहितवादी मंडळाने कुसुमाग्रजांच्या स्मारकासाठी संमेलनाच्या माध्यमातून काही प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा व स्मारक पूर्णत्वासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही पुढे येत आहे.फोटो- २९ शिरवाडे वणी