सिडको : परिसरात महावितरण कंपनीचा निष्काळजीपणा हा नागरिकांच्या जिवावर बेतला जात असतानाही याबाबत महावितरण अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.सिडको भागात सुरुवातीपासूनच नागरिकांच्या घरासमोरच उच्च दाबाच्या वीजतारांचा विळखा असून, यात काही नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील वीजतारा भूमिगत केल्या असल्या तरी अजूनही अनेक भागांत हा धोका कायम आहे. याबरोबरच महावितण कंपनीच्या वतीने नागरिकांच्या जिवाला धोका होईल, अशा पद्धतीने नागरिकांच्या घरासमोरच नवीन मिनी फिडर बसविण्यात आले असून, या फिडरच्या धोकादायक केबल बाहेरच असल्याचे दिसून येत असल्याने याचा अनेकांना शॉक लागून दुखापत झाल्याचे प्रकार उघड झाले आहे. महावितरणने शाळा व महाविद्यालयासमोर लावण्यात आलेले मिनी फिडर हे खराब झालेले दिसून येत असून, याचा शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना धोका निर्माण होवू शकत असतानाही याकडे लक्ष दिले जात नाही. जुने सिडको येथील भाजीमार्केट, तुळजा भवानी चौकातील काही नागरिकांच्या अगदी घराला लागूनच मिनी फिडर बसविण्याबाबत महावितरण कार्यालयात तक्रार करण्यात आली आहे.पावसामुळे अंबड येथील महालक्ष्मीनगर भागात असलेल्या मिनी फिडरमधील केबल नादुरुस्त असल्याने पाण्यात करंट उतरून यात एका रिक्षाचालकाचल मुत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणने येथील मिनी फिडरची उंची वाढवून त्याची दुरुस्ती केली.सिडको परिसरात निम्म्याहून अधिक भागातील नागरिकांच्या घरांसमोरून उच्च दाबाच्या वीजतारांचा धोका गेल्या अनेक वर्षांपासून असताना यात महावितरणच्या वतीने घरालगत, दुकाने, शाळा, महाविद्यालय असलेल्या ठिकाणी लावण्यात आलेले मिनी फिडर हे अर्धवट स्वरूपात झाकलेले आहे. त्यातील धोकादायक केबल बाहेरच असल्याचे दिसून येत असून, पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.
महावितरणचा निष्काळजीपणा अन् जिवाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:20 AM