नाशिक : महापालिकेमार्फत शहरात २१ हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुरू असून, सुमारे पावणे पाच कोटी रुपये खर्चून मक्तेदारामार्फत सदर वृक्षलागवड केली जात असली तरी लागवडीचे निव्वळ सोपस्कार पार पाडले जात आहेत. अनेक ठिकाणी दहा फुटाच्यावर लावण्यात आलेले वृक्ष संगोपनाअभावी जळून गेले आहेत, तर असंख्य वृक्षांनी मान टाकली आहे. केवळ उद्दिष्ट पार पाडणे हाच उद्देश त्यातून स्पष्ट दिसून येत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत नागरीप्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या सुस्त कारभारावरही नागरिक तोंडसुख घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिकेने शहरात २१ हजार वृक्षरोपांची लागवड करण्याचा कार्यक्रम जन २०१५ मध्ये हाती घेतला होता. त्यासाठी कल्पतरू कन्स्ट्रक्शन, महारुद्र एंटरप्रायझेस, भाग्यश्री कन्स्ट्रक्शन, ज्योती सोसायटी, टेरेकॉन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेड या खासगी एजन्सीला काम देण्यात आले आहे. सदर एजन्सीला दहा फुटावरील वृक्षरोपांची लागवड करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय, सदर वृक्षांची लागवड केल्यानंतर एक वर्षापर्यंत त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी खासगी एजन्सीवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार, खासगी एजन्सीमार्फत शहरातील सहाही विभागांमध्ये वृक्षलागवडीचे काम अद्यापही सुरू आहे. महापालिकेने वृक्ष लागवडीसाठी संबंधित एजन्सीला मनपाचे मोकळे भुखंड, सार्वजनिक ठिकाणे, नदी किनारे या स्वरूपातील जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, मक्तेदारांकडून वृक्ष लावले जात असले तरी त्याच्या संगोपनाकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या असंख्य वृक्षांनी मान टाकून दिली आहे. वृक्षाचे धड संगोपन होत नसल्याने अनेक भागांत उभे वृक्ष जळून गेले आहेत. रस्त्यांच्या दुभाजकांमध्येही वृक्ष लावण्यात आले आहेत, परंतु त्यांचीही स्थिती गंभीर आहे. आता उन्हाळ्यात वृक्षरोपांना तगविण्यासाठी पाण्याची गरज भासणार आहे. परंतु केवळ वृक्ष लागवड करून मक्तेदार मोकळे झाले असून, त्याच्या संगोपनाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे महापालिकेचे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट केवळ नावापुरताच राहणार असल्याचे चित्र आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गेल्या दीड-दोन वर्षांपासून महापालिकेमार्फत वृक्षलागवडीचा घोळ सुरू आहे. वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीनंतर महापालिकेला रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे वृक्ष हटविणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)
वृक्षलागवडीचे निव्वळ सोपस्कार
By admin | Published: February 14, 2017 12:55 AM