शहराचे हवामान उत्तम राखण्यासाठी केवळ वाहने आणि कारखानेच जबाबदार असतात असे नाही, तर नैसर्गिक साधन संपत्तीचा अमर्यादित वापर देखील कारणीभूत असतो, तो कमी करण्यासाठी आता पर्यावरणस्नेही इमारती उभारण्यावर भर देण्यात येेणार आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक मोहिमेचा भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जगात पर्यावरणाचा प्रश्न भेडसावतो आहे. त्यामुळे आता जागतिक स्तरावर यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. रेस टू झीरो या जागतिक मोहिमेत नाशिक महापालिकेने गेल्या मे महिन्यातच सहभाग नोंदवला आहे. तसेच त्यावर कृती देखील करण्यात येत आहे. अनेक जागतिक प्रयोग नाशिकसारख्या शहरात राबवणे शक्य आहे काय, याचा विचार केला जाणार आहेत. मात्र, त्याबरोबर कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर काही निर्णय घेण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत २०३० पर्यंत नाशिकमध्ये आता नेट झीरो कार्बन इमारती राहणार आहेत.
कोणत्याही इमारतीसाठी नैसर्गिक साधनांचा वापर व्हावा आणि तसेच टाकाऊ पाणी कचऱ्याचा देखील पुनर्वापर व्हावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. अशा काही इमारती सध्या नाशिकमध्ये उभ्या असून त्याला ग्रीन बिल्डिंग असेही म्हणतात. मात्र, त्या हौस आणि अपवाद म्हणून न राहता सर्वच इमारतींना अशाप्रकारचे निकष लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आता इमारतींच्या साहित्यात देखील तापमान कायम राखणारे घटक वापरावे लागतील तसेच सौर ऊर्जेचा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर, घनकचऱ्याचे त्याच परिसरात सेंद्रिय खत तयार करून त्याचा वापर करणे अशाप्रकारच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात येणार आहे. सध्या दोन लाख चौरस फूट बांधकाम असलेल्या मोठ्या गृहनिर्माण संस्थांना अशा प्रकारच्या तरतुदी करणे बंधनकारक असले तरी भविष्यात अशा इमारती अधिक प्रमाणात वाढाव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच त्यासाठी प्रोत्साहनपर सवलत योजना लागू करण्याचा देखील प्रशासनाचा विचार आहे.
इन्फो...
नाशिक महापालिकेच्या आता सर्व मिळकती पर्यावरण स्नेही
नाशिक महापालिकेच्या सर्वच इमारती ग्रीन बिल्डिंग अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर खासगी मिळकतींचा वापर करण्यात येईल. सध्या ग्रीन बिल्डिंग नसल्या तरी अनेक इमारतींवर महापालिकेने सौरऊर्जा उपकरण वापरणे सुरू केले आहे.
इन्फो...
पर्यावरण स्नेही इमारतींमुळे फायदाच फायदा
पर्यावरण स्नेही इमारतींमुळे शासन किंवा महापालिकेकडून काही अतिरिक्त सवलती मिळवणे वेगळा भाग आहे. मात्र, या इमारतीत खेळती हवा राहिली तर पंखे, वातानुकूलन यंत्रे वापरण्याची गरज राहत नाही. सौरऊर्जेमुळे वीज बिलाची बचत होईल. तसेच सांडपाण्याचा पुनर्वापर केल्याने महापालिकेच्या विकतच्या पाण्याचा खर्च वाचू शकेल. सेंद्रिय खतामुळे देखील परिसरातील बाग फुलवता येईल. त्यामुळे केवळ महापालिका सांगते म्हणून नव्हे तर निसर्गपूरक जीवनशैलीचा वापर हा अधिक चांगला आरोग्यदायी हवामान राखणारा ठरेल.
- शिवकुमार वंजारी, पर्यावरण अधिकारी, महापालिका