नाशिक : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी,शस्त्र आणि शब्द यातून क्रांतीला आणि क्रांतिकारकांना प्रेरणा देताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या दोघांनीही दिलेले योगदान अनमाेल असल्याचे ॲड. भानुदास शौचे यांनी सांगितले.
वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्व. डॉ. वि. म. गोगटे स्मृतिप्रीत्यर्थ अठ्ठाविसावे पुष्प त्यांनी गुंफले. या वेळी ॲड. शौचे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आढावा घेतला.
सधन कुटुंबात जन्माला येऊनही नेताजींनी स्वतंत्र भारताचा ध्यास घेतला. अवघ्या ४८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी इंग्रजांच्या छातीत धडकी भरवली. संघर्ष, त्याग यातून नेताजींनी देश स्वतंत्र कसा होईल, यासाठी आयुष्य पणाला लावले. ‘द इंडियन स्ट्रगल’ आणि ‘इंडियन पिलग्रीम’ या पुस्तकातून जहाल विचारांची पेरणी करताना नेताजींनी काॅंग्रेस संघटनेतील प्रस्थापितांशी संघर्ष केला. भारत स्वतंत्र व्हावा हा एकमेव उद्देश नेताजींसमोर होता, असेही शौचे यांनी नमूद केले.
नेताजी आणि सावरकर यांचे विचार वेगळे असले तरी ध्येय मात्र ब्रिटिशांपासूनच्या देशमुक्तीचे होते. प्रसंगी बलिदान देण्याची भावना त्यांच्यात होती. दोघांनीही जीवनात राष्ट्रविचारालाच सर्वप्रथम स्थान दिले. त्यापुढे कोणताही विचार असू शकत नाही. म्हणून राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे ॲड. शौचे यांनी नमूद केले.
आझाद हिंद सेनेची स्थापना करून नेताजींनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला. तेव्हा क्षेत्रहीन सरकार म्हणून जपानने आझाद हिंद सेनेला मान्यता देऊन त्यांना अंदमान, निकोबार बेटे दिली होती.
सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देताना ॲड. शौचे यांनी सावकरांच्या शब्दांतूनच क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाल्याचे ॲड. शौचे यांनी नमूद केले. स्वातंत्र्य देवतेचे स्तोत्र, शिवरायांची आरती म्हणजे देशाचा मोठा ठेवा आहे. जातिभेद, अस्पृश्य निवारण यासाठी सावरकरांनी कोकणात पतित पावन मंदिराच्या स्थापनेसह सर्व समाजांच्या एकत्रीकरणावर भर दिल्याचेही त्यांनी सांगितले. क्रांतिकारकांनी स्वतःचा विचार केला असता, तर भारत स्वतंत्र झाला नसता. आपण जगतो ते क्रांतिकारकांच्या कष्टाचे फळ असल्याचे मत ॲड. शौचे यांनी नमूद केले. व्याख्यानमालेच्या चिटणीस संगीता बाफना यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी आभार मानले.
-------------------------
आजचे व्याख्यान
वक्ते : डॉ. शिरीष राजे
विषय : स्व-मनाची शक्ती
फोटो
२८ॲड. शौचे