लोकमत न्यूज नेटवर्क पंचवटी : सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यांना गुन्ह्यासाठी भाडेतत्त्वावर नव्या कोऱ्या विना क्रमांकाच्या दुचाकी भाड्याने देणाऱ्या पेठरोडवरील मेहेरधाम येथील सागर मनोहर खरे या संशयिताला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित खरे याने सोनसाखळी चोरट्यांना कधी स्वत:ची तर कधी मित्रांच्या नव्या कोऱ्या दुचाकी चोरीसाठी भाडेतत्त्वावर दिल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. (दि.१२) संशयित किरण सोनवणे व त्याचा सहकारी विलास मिरजकर यांनी सोनसाखळी ओरबाडून पलायन केले होते. सदर प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी नव्या काळ्या रंगाच्या पल्सरचा पाठलाग केला असता चोरट्यांची दुचाकी घसरल्याने ते पडले व नंतर त्यांनी पळ काढला होता. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पल्सर ताब्यात घेऊन चेसी नंबरवरून ती कोणत्या शोरूममधून कोणी खरेदी केली याची माहिती मिळविली व त्या माहितीच्या आधारे किरण सोनवणे, विलास मिरजकर या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केली असता सागर खरे हा चोरीसाठी दुचाकी देत असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी खरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ओळखीच्या मित्रांच्या दुचाकी एक हजार ते दोन हजार रुपये भाडेतत्त्वावर घेत असल्याचे स्पष्ट केले.
चोरट्यांना नव्या दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय
By admin | Published: May 16, 2017 12:02 AM