मालेगाव : जुने बसस्थानक येथून दुपारी साडेबारा वाजता नांदगाव मार्गे-औरंगाबाद प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. नवीन बससेवा सुरु करण्याची मागणी आम्ही मेहुणेकर विधायक संघर्ष समितीने नाशिक-च्या विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद देत मालेगाव येथील जुने बसस्थानक येथून दुपारी साडेबारा वाजता नांदगाव मार्गे औरंगाबाद बस सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २२) जुने बसस्थानक येथे मालेगाव ते औरंगाबाद बसला आम्ही मेहुणेकर समितीने पुष्पहार घालून व मालेगाव आगारचे वाहतूक निरीक्षक नितीन बोरसे व वाहतूक नियंत्रक चौरे, चालक व वाहक यांना पुष्पगुच्छ देऊन बस रवाना केली. नांदगाव-औरंगाबाद मार्गावर प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते; परंतु सध्याच्या परिस्थितीत नांदगाव आगाराची दुपारी साडेबारा वाजता सुटणारी मालेगाव-नांदगाव मार्गे-जालना बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. मालेगावहून बस सुरू झाल्यामुळे बस वेळेवर मार्गस्थ होईल. सकाळी ८ वाजता जालना व सायंकाळी साडेपाचला औरंगाबाद मुक्काम बस चालू करणार असल्याचे वाहतूक निरीक्षक नितीन बोरसे यांनी सांगितले.आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने मालेगावकडून अजून एक नवीन बस सायंकाळी साडेचार वाजेनंतर औरंगाबादसाठी सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी निखिल पवार, अतुल लोढा, राहुल देवरे, देवा पाटील, रविराज सोनार, विवेक वारुळे, देवेंद्र अलई, गौतम मेहता, महेंद्र भालेराव, गणेश जंगम, योगेश निकम आदी उपस्थित होते.
नांदगावमार्गे औरंगाबाद नवीन बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:23 AM