नाशिक : स्थायी समितीने घंटागाडी ठेक्याला मान्यता देऊन महिना उलटला तरी अद्याप त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याबद्दल सभापती सलीम शेख यांनी आरोग्य विभागाला जाब विचारला. त्यावेळी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबत ठेकेदारांनी नवीन घंटागाड्यांसह अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी मुदत मागितली असल्याने नवीन घंटागाड्या येण्यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नववर्षातच नाशिकच्या रस्त्यावर नवीन घंटागाड्या धावताना बघायला मिळणार आहेत. मागील महिन्यात स्थायी समितीने घंटागाडीच्या ठेक्याला मान्यता दिली होती. सुमारे १७६ कोटी रुपयांचा पाच वर्षे कालावधीसाठी विभागनिहाय घंटागाडीचा ठेका देण्यात आलेला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या घंटागाडीच्या ठेक्याला स्थायी समितीने हिरवा कंदील दाखवतानाच रस्त्यावर नवीन घंटागाड्या आणण्याची अट घातली आहे. सद्यस्थितीत घंटागाडी ठेकेदारांकडून महापालिकेच्याच मालकीच्या घंटागाड्यांचा वापर होत आहे. स्थायी समितीने घंटागाडीच्या ठेक्याला मंजुरी देऊन महिना उलटला तरी त्यावर कार्यवाही होत नसल्याने सभापती सलीम शेख यांनी आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांना जाब विचारला व लवकरात लवकर कार्यवाहीचे आदेश दिले. यावेळी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले, घंटागाडीच्या ठेक्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, घंटागाडीच्या ठेकेदारांनी भेट घेऊन नवीन घंटागाड्यांसाठी आणखी मुदत मागवून घेतली आहे. त्यामुळे आणखी दोन ते महिने नवीन घंटागाड्या येण्यास अवधी लागणार आहे. ठेकेदारांना नवीन घंटागाड्या बंधनकारक करतानाच त्यांना प्रत्येक गाडीवर जीपीएस यंत्रणाही लावणे बंधनकारक केले आहे. सर्व ठेकेदारांनी एकाचवेळी घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविल्याशिवाय गाड्या रस्त्यावर आणता येणार नाही. त्यामुळे काही कालावधी लागणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. आयुक्तांच्या या स्पष्टीकरणामुळे नवीन घंटागाड्या रस्त्यावर धावण्यास पुढचे वर्ष उजडणार असून, त्यावेळी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असेल अथवा महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली असेल.
नववर्षातच धावणार नवीन घंटागाड्या
By admin | Published: September 23, 2016 1:46 AM