नाशिक : शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने नव्याने तयार केलेल्या कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधास महासभेने एकमताने मंजुरी दिली. आकृतिबंधात महापालिकेत नवीन ७६५६ पदे प्रस्तावित करण्यात आली असून, शासनाकडून या पदांना मंजुरी मिळाल्यास आस्थापना परिशिष्टावरील एकूण पदसंख्या १४ हजार ७४६ इतकी होणार आहे. दरम्यान, काही नवीन विभाग प्रस्तावित करत त्यासाठीही पदे निश्चित करण्यात आली. आता शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे.महापालिकेने सेवा प्रवेश नियमांचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला होता. त्यावेळी शासनाने महापालिकेला नव्याने आकृतिबंध तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महापालिकेने आस्थापनेवरील गट ‘अ’ ते ‘ड’ मधील मंजूर पदांचा व नव्याने आवश्यक असलेल्या पदांचा आढावा घेऊन आकृतिबंध तयार केला. महापालिका आस्थापना परिशिष्टावर सद्यस्थितीत विविध संवर्गामध्ये एकूण ७०९० पदे मंजूर आहेत. त्यात अ गटातील १३९, ब गटातील ८३, क गटातील २१९९ आणि ड गटातील ४६६९ पदांचा समावेश आहे. आता नव्याने आवश्यक असलेल्या पदांची संख्या ७६५६ दर्शविण्यात आली असून, त्यात अ गटातील २७५, ब गटातील १०९, क गटातील २४२७ आणि ड गटातील ४८४५ पदांचा समावेश आहे. त्यामुळे नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधानुसार, आवश्यक असलेल्या पदांची संख्या अ गटासाठी ४१४, ब गटासाठी १९२, क गटासाठी ४५९९ तर ड गटासाठी ९५४१ इतकी झाली आहे. याशिवाय, महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागासाठी मंजूर पदसंख्या १४८ व आवश्यक पदसंख्या ५० मिळून १९८ इतकी दर्शविण्यात आली आहे. सदर आकृतिबंधाला महासभेने मंजुरी दिली. आता प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार असून, शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
नवीन आकृतिबंधास महासभेची मंजुरी
By admin | Published: October 15, 2016 2:33 AM